चीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, 60 लोकांना लागण, 7 जणांचा मृत्यू; जाणून घ्या कसा पसरतो

3426

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडालेला असताना आता आणखी एक नवीन व्हायरस येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नवीन व्हायरसच्या कचाट्यात आतापर्यंत 60 लोक आले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनने सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने याला दुजोरा दिला असून चीनमधील जियांगशू आणि अनहुई प्रांतात हा नवीन व्हायरस जन्माला आला असून एक किडा चावल्याने याची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

चीनमध्ये नव्याने सापडलेल्या या व्हायरसचा नाव हुईयांगशान बनयांग व्हायरस (Huaiyangshan banyangvirus) अर्थात SFTS व्हायरस असे आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असून जियांगशू प्रांतात 37 आणि अनहुई प्रांतात 23 लोकांना याची लागण झाली आहे. दोन्ही प्रांतात मिळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, एक विशिष्ट प्रकारचा किडा चावल्याने याची लागण होत आहे. पीडित व्यक्तीला ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. तसेच रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी होत असल्याने मृत्यूचा धोका अधिक आहे. हा संक्रमित आजार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

चीनमध्ये हा व्हायरस पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पसरला आहे. याआधी जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि तैवान या देशात हा व्हायरस आढळला होता. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 ते 30 टक्के असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या