हिंदुस्थानची चिंता वाढणार, तणावाच्या स्थितीत जिनपिंग पाकिस्तानला जाणार; नेपाळच्या पंतप्रधानांनाही बोलवणार

2729

लडाख सीमेवर तणावाची स्थिती असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशात व्यापार आणि सैन्य स्तरावर अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. झिनपिंग यांच्या या दौऱ्यादरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांना याचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानला घेरण्यासाठी चीन पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांची साखळी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसातील नेपाळच्या पंतप्रधानांची हिंदुस्थानविरोधी वक्तव्य पाहता नेपाळ चीनच्या हातचे बाहुले बनत असल्याचे दिसते. तसेच चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प सीपेकला नेपाळशी जोडण्याची चीनची योजना आहे. याला ‘हिमालयन कॉरिडॉर’ असे नाव देण्यात येणार आहे.

झिनपिंग यांच्या दौऱ्यादरम्यान व्यापार, सैन्य आणि अन्य क्षेत्रातील करार होण्याची शक्यता आहे. यादरम्यान झिनपिंग इस्लामाबाद येथे पाकिस्तान-चीनच्या वार्षिक बैठकीत सहभागी होतील. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर झिनपिंग यांचा हा पाकिस्तानचा हा दुसरा दौरा आहे. याआधी 2015 ला ते इस्लामाबादच्या दौऱ्यावर गेले होते. तसेच याआधी ते जून महिन्यात पाकिस्तानला जाणार होते, मात्र कोरोना संकटकाळामुळे हा दौरा रद्द झाला होता. आता हा लांबलेला दौरा येत्या काही दिवसात होणार असून याची अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हिंदुस्थानची चिंता वाढणार
झिनपिंग 2015 ला पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते तेव्हा दोन्ही देशात 51 करार झाले होते. आता लडाखमध्ये तणाव असताना झिनपिंग पाकिस्तान दौऱ्यावर जात असल्याने हिंदुस्थानची चिंता वाढणार आहे. चीन आणि पाकिस्तान पीओकेमध्ये देखील अनेक योजना राबवत आहेत, तसेच हत्यारांची देवाण-घेवाण करत आहेत. या दौऱ्यात देखील झिनपिंग हिंदुस्थानला डिवचण्यासाठी पाकिस्तानला अत्याधुनिक हत्यार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या