हिंदुस्थानने गुजरातजवळ चिनी जहाज घेतलं ताब्यात, जहाजावर क्षेपणास्त्र प्रणालीची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून ते गुजरातला भेट देणार आहेत. याच पार्श्वभूमिवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून गुजरातच्या कांडला बंदराजवळ एक चिनी जहाज हिंदुस्थानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानकडे जाणारे ‘द कुई यून’ हे चिनी जहाज हिंदुस्थानच्या कस्टम विभागाने गुजरातच्या कांडला बंदराजवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या जहाजावर अणूहल्ला करण्यास सक्षम असणारी क्षेपणास्त्र प्रणाली असण्याची दाट शक्यता आहे. क्षेपणास्त्र लॉन्च करण्यासाठी उपयोगी येणारे एक उपकरणही यावर मिळाले आहे. दोन आठवड्यांपासून हे जहाज कांडला बंदराजवळ थांबवण्यात आले असून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी या जहाजाची चौकशी केली आहे.

‘द कुई यून’ या जहाजावर हॉन्गकॉन्गचा झेंडा लावलेला होता. हे जहाज चिनच्या जियांगयिन बंदरावरून हे पाकिस्तानच्या कराची येथील मोहम्मद बिन कासिम बंदराच्या दिशेने 17 जानेवारीला निघाले होते. 3 फेब्रुवारीला गुजरातजवळील कांडला बंदराजवळ कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे जहाज रोखले. गुप्त माहितीच्या आधारावर हे जहाज रोखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे जहाज पाकिस्तानच्या ज्या कासिम बंदराकडे जात होते, ते पाकिस्तानच्या अणूकार्यक्रमाचे कार्य करणाऱ्या सुपारको या संस्थेपासून जवळ आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना या जहाजाववर संशय आला आणि त्यानंतर ते ताब्यात घेण्यात आले. या जहाजावर चालकासह एकूण 22 लोक आहेत.

ship

जहाजावरील क्रू मेंबर्सने असा दावा केला आहे की हे उपकरण एक औद्योगिक ड्रायर आहे. परंतु डीआरडीओच्या प्राथमिक चौकशीमध्ये हे उपकरण एक ऑटोक्लेव्ह असल्याचे समोर आले आहे. याचा वापर क्षेपणास्त्र लॉन्चिंगसाठी होतो. याची लांबी जवळपास 17 ते 18 मीटर असून रुंदी 4 मीटर आहे. तपासामध्ये हे उपकरण खरंच ऑटोक्लेव्ह असल्याचे सिद्ध झाल्यास जहाजावरील क्रू मेंबर आणि मालकाविरोधात आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे कारवाई करण्यात येईल. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले ाहे.

आपली प्रतिक्रिया द्या