डाएट करणे महिलेच्या आले अंगाशी, खोकल्याची उबळ आली अन् बरगडीच तुटली

सध्याच्या फॅशनेबल जगतात प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे, अस वाटते. यासाठी बरेच जण आपला लुक कसा दिसतोय, याबाबतीत सजग असतात. स्लिम होण्यासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करतात. काही वेळा डाएटच्या अति आहारी गेल्यामुळे शरीरयष्टीवर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो. चीनमध्ये एका महिलेच्या बाबतीत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.

चीनमधील शंघाईमध्ये राहणाऱ्या हुआंग नावाच्या महिलेच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक घटना घडली आहे. या महिलेला जोरजोरात खोकला येत होता. त्याआधी नुकतेच काही मसालेदार पदार्थ खाल्ले होते. त्यानंतर तिला खोकल्याची उबळ येत होती. यादरम्यान तिच्या छातीतून आवाज आला. काही तासांनंतर या महिलेला श्वास घेणे त्रासदायक होऊ लागले. बोलतानाही अडचण येत होती. एकामागोमाग एक असे सगळे त्रास होऊ लागल्यावर तिने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून तपासणी केली असता, त्यांनी सांगितले की, हुआंगला सतत जोरजोरात खोकला येत होता. डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून तिची तपासणी केली. खोकल्याची उबळ आल्यामुळे तिचा अनपेक्षित अपघात झाला होता. तिच्या शरीरातील चार बरगड्या तुटल्या असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

त्यानंतर डॉक्टरांनी हुआंगच्या चारही तुटलेल्या बरगड्यांवर मलमपट्टी केली. तिला महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी बरगड्या तुटण्याचे कारण सांगितले की, हुआंगची शरीरयष्टी अत्यंत बारीक होती. बारीक राहण्यासाठी तिने केलेले अतिपथ्यही यासाठी कारणीभूत आहे. तिची उंची 5 फूट 6 इंच आणि तिचे वजन 57 किलो आहे. शरीराला पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे तिचे शरीर अत्यंत नाजूक झाले होते. त्यामुळे सतत आणि जोरात येणाऱ्या खोकल्याचा परिणाम तिच्या बरगड्यांवर झाला आणि त्या तुटल्या. एखाद्या रुग्णाच्या बाबतीत असा प्रसंग घडणे हे अत्यंत दुर्मिळ आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, हुआंग या घटनेनंतर आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष देत आहे. डॉक्टरांनी दुसऱ्यांदा केलेल्या तपासणीत तिच्या सर्व बरगड्या स्पष्ट दिसत आहेत. तिची प्रकृती सध्या बरी आहे आणि ती लवकरच तिचे दैनंदिन जीवन सुरू करणार आहे, अशी माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. हुआंगने, भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी वजनवाढीकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.