चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून भाजपने इथून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघासाठीचा आपला उमेदवार जाहीर केला असून त्यांनी नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे.

ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथला उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून नाना काटे यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ हा आम्हाला विश्वास आहे, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

उमेदवारी घोषित झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सहानुभूती व्यक्त केली आहे. मात्र, सहानुभूती आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अजित पवार यांनी ज्या प्रकारे चिंचवडचा विकास केला आहे. त्याच मुद्द्यावरून आम्ही या निवडणुकीला पुढे जाऊ.