चीनचे सैन्य हिंदुस्थानच्या हद्दीत एक कि.मी.पर्यंत घुसले

37

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सिक्कीम सीमेवरील डोकलाम सेक्टरमध्ये तणाव कायम असतानाच चीनच्या लाल माकडांची मुजोरी कायम आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी उत्तराखंडमधील बारहोटीमध्ये घुसखोरी करून हिंदुस्थानच्या हद्दीत एक कि. मी.पर्यंत प्रवेश केला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हिंदुस्थानच्या जवानांनी घुसखोरीस जोरदार विरोध केल्यानंतर चीनचे जवान माघारी फिरले.

२५ जुलैला सकाळी ९ वाजता चीनने घुसखोरी केली. विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे २६ जुलैला ब्रिक्स परिषदेसाठी चीनला गेले होते. तत्पूर्वीच चीनने कुरापत काढली. चीनचे जवान एक कि. मी. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले आणि तेथे जनावरे चरण्यासाठी आलेले काही शेतकरी आणि मेंढपाळांना धमक्या देऊ लागले. त्यानंतर चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले. तेथे तैनात असलेल्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांनी जोरदार विरोध केला. सुमारे दोन तास चीनचे जवान हिंदुस्थानच्या हद्दीत होते. त्यानंतर माघार फिरले.

आयटीबीपीची पेट्रोलिंग, पण विनाहत्यार
उत्तराखंड येथील बारहोटी, कौरिल आणि हिमाचल प्रदेश सीमेवरील शित्की येथे हिंदुस्थानी लष्कराच्या तीन चौक्या आहेत. आयटीबीपीचे जवान येथे साध्या कपड्यात पेट्रोलिंग करतात, मात्र २०००च्या करारानुसार हे जवान कोणतेही शस्त्र जवळ बाळगत नाहीत. गेल्या वर्षीही बारहोटीमध्ये २०० मीटरपर्यंत चीनने घुसखोरी केली होती तेव्हा तणाव निर्माण झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या