हिंदुस्थानच्या हद्दीत चीनची घुसखोरी; दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने

1073

हिंदुस्थानच्या हद्दीत चीनने पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले आहेत. चीनने याआधी डोकलाममध्ये घुसखोरी केली होती. त्यावेळीही दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. आता चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. जम्मू कश्मीर आणि लडाखमध्ये थंडी वाढल्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही घुसखोरी झाली आहे. यावेळी घुसखोरीसाठी चीनने नवीन पद्धत अवलंबिली आहे. हिंदुस्थानी हद्दीत जनावरांना चरण्यासाठी आणणाऱ्या गुराख्यांना रोखण्यासाठी चीनने त्यांच्या भागातील गुराख्यांना हिंदुस्थानी हद्दीत पाठवले. लडाखला लागून असलेल्या चीनच्या सीमारेषा लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलजवळून ही घुसखोरी करण्यात आली आहे. लडाखच्या चतूर भागात चीनी सैनिकांनी गुराख्यांच्या मदतीने ही घुसखोरी केली आहे.

आता लडाखच्या या भागात आलेले चीनमधील गुराखी हिंदुस्थानी गुराख्यांना या भागात येण्यास मज्जाव करत आहेत. तसेच चीनच्या गुराख्यांची मोठया प्रमाणात घुसखोरी सुरू असून चीनी सैनिक त्यांना पाठबळ देत आहेत. लखाडच्या चतूर भागात हिंदुस्थानी गुराखी त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी नेतात. मात्र, आता या हिंदुस्थानी गुराख्यांना चीनी गुराखी रोखत असून चीनचे सैनिकही हिंदुस्थानी गुराख्यांना भीती दाखवत आहेत. इंडो तिबेट सीमा पोलिसांना (आयटीबीपी) याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी सीमेवरील चीनी सैनिकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आता हा मुद्दा चीनी लष्करासमोर मांडण्यात येणार आहे.

लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलजवळच्या भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी चीनचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी घुसखोरीसह चीनकडून विविध मार्ग अवलंबण्यात येत आहेत. चीनी सैन्याने 2019 मध्ये लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याचे अनेकदा प्रयत्न केले आहेत. चीन आणि हिंदुस्थानच्या सीमारेषेजवळ तारांचे कुंपण किंवा सीमेची कोणतीही निशाणी नाही. त्यामुळे दोन्ही देशांत सीमेवरून वाद होत असतात. तसेच चीनकडून सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येतो. निश्चित सीमारेषा नसल्याने चीनकडून अनेकदा हिंदुस्थानी भागावर दावा करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चीनने केलेल्या घुसखोरीचा प्रश्न दोन्ही देशांनी चर्चेने मिटवला होता. आता चीनने गुराख्यांच्या मदतीने लडाखमध्ये घुसखोरी केल्याने दोन्ही देशांचे सैनिक पुन्हा आमनेसामने उभे ठाकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या