निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी काचेच्या पूलावर गेला….वादळाच्या तडाख्याने रेलिंगला लटकला..

चीनचा काचेचा पूल सध्या चर्चेत आला आहे. या पुलावर नुकत्याच झालेल्या अपघाताने या पूलाची चर्चा आहे. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि थरारक अनुभव घेण्यासाठी हा कचेचा पूल उभारण्यात आला आहे. असेच निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा जीव थोडक्यात बचावला आहे.

हा पर्यटक पूलावर असताना अचनाक वादळी वारे वाहण्यास सुरुवात झालीय. त्यांचा वेग आणि तीव्रता वाढत गेली. वादळाच्या या तडाख्यामुळे पूलाच्या काही काचा तुटल्या आणि 330 फूट उंचीच्या पुलावर पर्यटक अडकला. काचा तडकल्याने तो रेलिंगच्या आधारे उभा होता. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच बचाव पथकाने त्यांची सुटका केली.

बचाव पथकाने पर्यटकाला सुखरुप बाहेर काढले. मात्र, या घटनेने तो खूप घाबरला होता. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि थरार अनुभवण्यासाठी येथे आलो होतो. मात्र, निसर्गाचा थरार अनुभवायला मिळाल्याचे त्याने सांगितले. या घटनेचे फोटो व्हायरल होत असून या काचेच्या पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जगातील सर्वाधिक उंचीचा हा काचेचा पूल चीनच्या लॉंगजींग शहराच्या पियान पर्वतावर आहे. या काचेच्या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. हा काचेचा पूल कधीही तुटणार नाही असा दावा त्याच्या इंजिनीअरने केला होता. मात्र या अपघाताने तो दावा फेल ठरला आहे. या पूलाचे पर्यटकांना मोठे आकर्षण असून पुलाची लांबी 430 मीटर आहे आणि त्याची रुंदी सहा मीटर आहे.  सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि हा काचेचा पूल तडकला. पुलाच्या काही भागांतील काचा उडून गेल्या तर काही ठिकाणी काचा फुटल्या.

दुर्देवाने यावेळी एक पर्यटक पुलावर होता. जीव वाचवण्यासाठी तो 330 फूट अंतरावरील रेलिंगला लटकला होता.बचाव पथकातील जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. या घटनेचा फोटो प्रथम चीनी ट्वीटर वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोला चाळीस लाख व्ह्यूज मिळाले आहेत. घटनेनंतर तो पर्यटक घाबरलेला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे त्याचे समुपदेशन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या