तैवानमध्ये हस्तक्षेप कराल अण्वस्त्रांनी बेचिराख करू, चीनची जपानला धमकी

तैवानमध्ये हस्तक्षेप केलात तर तुमच्यावर अगणित अण्वस्त्रे सोडून तुम्हाला बेचिराख करू अशी धमकी चीनने जपानला दिली आहे. चीनने त्यांचा एक जुना व्हिडीओ नव्याने पोस्ट करत त्याद्वारे ही धमकी दिली आहे. शीगुआ नावाच्या युट्युबसारख्या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. 2 आठवड्यांपूर्वी हा व्हिडीओ पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या व्हिडीओला कोट्यवधी व्हूयज मिळाले होते. कालांतराने हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ चीनी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.

चीनजवळ असलेल्या तैवानवर आजपर्यंत एकदाही कम्युनिस्ट पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकला नव्हता. हाँगकाँगमधील विरोध मोडून काढण्यासाठी चीनने एक सुरक्षा कायदा तयार केला होता. हा कायदा अत्यंत जुलुमी असून त्याविरोधात हाँगकाँगमध्ये प्रचंड असंतोष आहे. हाँगकाँगनंतर चीनने आपले लक्ष तैवानकडे वळवले असल्याचं सांगितलं जात आहे.

जपानची वार्षिक सैनिकी श्वेतपत्रिका गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये म्हटलंय की जर चीनने तैवानवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले तर तो जपानच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असेल. चीनने तैवानवर हल्ला केला तर जपानी फौजा अमेरिकेशी हातमिळवणी करून संयुक्त पणे सैन्यदल उभे करतील असे जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी म्हटलंय. आसो यांच्या या विधानानंतर चीन संतापला असून त्यांनी वर्तमानपत्रातील लेखाद्वारे धमकी दिली आहे की तैवानमध्ये हस्तक्षेप केला तर जपानी सैन्य उद्वस्त करून टाकू.

आपली प्रतिक्रिया द्या