चीनमध्ये सैन्याने केले सत्तापालट? राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नजरकैदेत? सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटमुळे खळबळ

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याची अफवा वेगाने पसरतेय. सोशल मीडियावर या संदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. शी जिनपिंग यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनीही या संदर्भात ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. या अफवेची चौकशी करायला हवी असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

शी जिनपिंग हे उजबेकिस्तानमध्ये समरकंद एससीओ समिटमध्ये असतानाच त्यांना सेनाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर चीनमध्ये परतताच शी जिनपिंग यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. सोशल मीडियावर # XiJinping हा हॅशटॅग सुरू आहे. दरम्यान, या सोशल मीडियावरील अफवांचे चिनी कम्युनिस्ट पार्टी किंवा सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने खंडन केलेले नाही. त्यामुळे अनेकांच्या शंकेची पाल चुकचुकली आहे.

‘चीन संदर्भात एक नवीन अफवा सुरू असून याची चौकशी करायला हवी. शी जिनपिंग खरंच नजरकैदेत आहेत का? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे केला आहे. शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये आले होते आणि त्याच दरम्यान चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना त्यांना सेनाध्यक्षपदावरून हटवले. यानंतर त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याची अफवा उडाली आहे’, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. सोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे.

चिनी युजर्सने केला दावा

चीनमधील काही सोशल मीडिया युजर्सने शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले असून सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतल्याचा दावाही केला जातोय. जिनपिंग यांच्यानंतर आता ली कियाओमिंग हे चीनचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनणार असल्याची चर्चा सुरू आहे.