नर उंदरांना गर्भार बनवण्याचे चीनचे चाळे सुरू, राक्षसी प्रयोगासाठी पोटात गर्भाशये घुसवली

कोरोनाचा फैलाव चीनमधूनच सुरू झाला असा आरोप अनेक देशांनी केला आहे. विकृत प्रयोगातून हा विषाणू तयार झाला असं आरोप करणाऱ्यांचे म्हणणे आहे. वुहानमधल्या प्रयोगशाळेत वटवाघळांवर सुरू असलेल्या प्रयोगातून कोरोनाचा विषाणू तयार झाला आणि तो जगभर पसरत गेला असं काही तज्ज्ञ मंडळींना वाटत आहे. हे आरोप सुरू असतानाच चीनमध्ये नर उंदरांना गर्भार बनविण्यासाठीचे राक्षसी प्रयोग चीनने सुरू केल्याचं उघडकीस येतंय. विले फ्रँकसायन्सच्या अभ्यासाअंतर्गत हे वैज्ञानिक नर उंदराने सिझेरिअन पद्धतीने पिल्ले जन्माला घालावीत यासाठी प्रयत्न करत आहेत.

शांघायच्या नौदल वैद्यकीय विद्यापीठातील वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की उंदरावर सुरू असलेले हे प्रयोग यशस्वी ठरल्यास प्रजननासंदर्भात सुरू असलेल्या संशोधनास मोठी दिशा मिळेल आणि जीव विज्ञानावरही त्याचे दूरगामी परिणाम होतील. मात्र या प्रयोगाचा मानवाला कसा फायदा होईल हे त्यांनी सांगितले नाही. या प्रयोगावरून असा अंदाज बांधला जातोय की हा प्रयोग मानवावर करून लिंगबदल केलेल्या लोकांना गर्भधारणा करता यावी यासाठी प्रयत्न केले जातील.

या प्रयोगामध्ये नर आणि मादी उंदराची त्वचा जोडून त्यातील रक्तप्रवाह एकसमान करण्यात आला आहे. यानंतर इतर कुठल्या तरी मादी उंदराचे गर्भाशय नर उंदराच्या शरीरात घुसवले जाते. यानंतर नर आणि मादी दोघांच्या गर्भाशयात भ्रूण प्रत्यारोपित करण्यात आले. यानंतर 27 दिवसांपर्यंत सामान्य भ्रूण विकसित होऊ दिले आणि नर उंदराकडून 10 पिल्लांची निर्मिती करून घेण्यात आली. या प्रयोगात नर किंवा मादी उंदिराच्या हृदय, फुफ्फुसे आणि यकृतावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा सगळा प्रयोग चिनी वैज्ञानिकांचा ‘नीच’पणा असल्याचं प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेच्या वरिष्ठ विज्ञान धोरण सल्लागार एमिली मॅकआयव्हर यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या