चिनी गुप्तहेरांचा सापळा आणि उपाययोजना

4474
प्रातिनिधिक फोटो

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानने चिनी गुप्तचर यंत्रणेपासून सुरक्षित राहण्यासाठी काही पावले उचलली आहेत, पण अद्यापही अनेक उपाय करणे नितांत गरजेचे आहे. चीनने काही सॉफ्टवेअर्समध्ये ट्रोझन हॉर्स घालून हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्रांविषयीची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घेता हिंदुस्थानने सरकारी स्तरावरील आपली एकंदर संगणकप्रणाली सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य बनवणे गरजेचे आहे. तसेच हिंदुस्थानातील प्रत्येक चिनी नागरिकाकडे गुप्तहेर म्हणून पाहण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.

चीनच्या गुप्तहेर संस्थेला एमएसएस म्हणजे मिलिटरी सिक्रेट सर्व्हिस असे म्हटले जाते. या संस्थेच्या मदतीने चीन वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन्स करत असतो. अशाच प्रकारे चीनने एक ऑपरेशन ऑस्ट्रेलियाच्या संसद सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी केले होते. चीनचे गुप्तहेर वेगवेगळय़ा देशांत जाऊन तिथल्या राज्यकर्त्यांना, राजकीय पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, नोकरशहांना किंवा महत्त्वाच्या मुत्सद्देगिरी करणाऱया अधिकाऱयांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मदतीने गोपनीय स्वरूपाची धोरणात्मक माहिती चोरणे आणि त्याचा वापर चीनची आर्थिक घुसखोरी व आक्रमणाला मदत करण्यासाठी करणे हा याचा हेतू असतो. महत्त्वाच्या व्यक्तींना चीनच्या बाजूने वळवण्यासाठी फिमेल स्पाईज किंवा महिलांचा वापर केला जातो. राज्यकर्ते, नोकरशाही, सरकारी अधिकारी यांना फसवण्यासाठी हनी ट्रपिंग मोठय़ा प्रमाणावर होते.

जगभरातील सगळय़ा चिनी कंपन्यांमध्ये एक अंतर्गत सेल असतो, जो कम्युनिस्ट पार्टीचा उत्तरदायी असतो. राजकीय अजेंडा चालवणे, कंपनी चिनी दिशानिर्देशाचे पालन कसे करेल हे निश्चित करणे या सेलचे काम असते. उद्योगाच्या नावाखाली चिनी कंपनी जगभरामध्ये सक्रिय आहे. चीनने उद्योग राजकारणापासून कधीही वेगळा ठेवला नाही. चिनी कम्युनिस्ट पार्टीचे नऊ कोटी सदस्य आहेत आणि त्यातील अनेकांना परदेशात चिनी कंपन्यांमध्ये तैनात केले आहे किंवा गुप्तपणे तिथे ठेवले आहे.

चीन शेजारच्या राष्ट्रांना मोठय़ा प्रमाणावर शस्रास्रांचा पुरवठा करत असतो. ही शस्त्रास्त्रे देण्याचा मुख्य उद्देश असतो की, प्रशिक्षणाच्या नावाखाली चिनी सैनिक या देशांमध्ये घेऊन सीमावर्ती भागात गुप्तहेर माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, चीनने बांगलादेशला दोन पाणबुडय़ा दिलेल्या आहेत. अशाच प्रकारची मदत चीनने मालदीव, म्यानमार, श्रीलंका आणि नेपाळलाही केलेली आहे. बांगलादेशला दिलेल्या पाणबुडय़ा हा देश कोणाविरुद्ध वापरणार? त्यांना या पाणबुडय़ा चालवण्याचा अनुभव आहे की नाही? नसेल तर मग त्या चालणार कशा? यासाठी चिनी नौदलाचे सैनिक तेथे तैनात केले आहेत. यामुळे चीनला नेमका काय फायदा होतो? तर पाणबुडय़ांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली गस्ती घालण्याच्या माध्यमातून आजूबाजूंच्या किनारपट्टय़ांची टेहळणी करता येते. कारण पाणबुडी किंवा नौदलाच्या युद्धामध्ये समुद्र किती खोल आहे, किती उथळ आहे, कोणत्या भागात पाणबुडय़ा जाऊ शकतात, खोलवर पाणी असल्यास तिथे कुठली जहाजे जाऊ शकतात किंवा जर आपल्याला एखाद्या बेटावर आक्रमण करायचे असेल तर त्यासाठी कोणत्या जागा सोयीस्कर आहेत अशा प्रकारची नौदलाची माहिती मिळणे गरजेचे असते. हेच काम चिनी पाणबुडय़ा आज करत आहे. लढाईमध्ये नौदलाची जहाजे कुठे कशा प्रकारे वापरता येतील? भूदलाचा वापर नेमका कसा कुठे आणि केव्हा करता येईल? हवाई दलाला या भागांमध्ये लढाई नेमकी कशी करावी लागेल? पारंपरिक युद्धाकरिता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. याशिवाय अपारंपरिक युद्धाकरिता इतर घटकांचा मग ते बंडखोर असो की असंतुष्ट नागरिक, त्यांचा वापर कसा करायचा यावर विचार केला जातो. सध्या चीन म्यानमारमध्ये म्यानमारमधील बंडखोर गट आराकान आर्मीचा वापर हिंदुस्थानी प्रकल्पांवरती हल्ला करण्याकरता करत आहे.

चीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडेच हिंदुस्थानने 59 चिनी ऍप्सवर बंदी घातली. त्यांचा वापर हिंदुस्थानींची माहिती किंवा बिग डेटा गोळा करण्यासाठी केला जात होता. याशिवाय चीनचे मोबाईल्स, लॅपटॉप्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसही हे काम करत असतात. त्यामुळे अशा चिनी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आपल्याकडे असतील तर चिनी हेर आपल्या घरात आहे असे समजावे. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांमध्ये चीनने अशा प्रकारची हेरगिरी केलेली आहे. चीनचे एक महत्त्वाचे शस्त्र्ा म्हणजे त्यांचे हॅकर्स. इतर देशांतील संगणकांमध्ये शिरून त्यातील माहिती चोरण्याचा प्रयत्न चिनी हॅकर्स करत असतात. जवळपास 103 देशांच्या संगणकांमधील बिग डेटा चिनी हॅकर्सनी चोरल्याचे समोर आले आहे. हे हॅकर्स स्वतःसाठी काम करतात असे दाखवले जाते; पण प्रत्यक्षात त्यामागे चिनी सरकार किंवा चीनच्या गुप्तहेर संस्था असतात.

चीनने हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संगणक हॅक करून हिंदुस्थानचे दक्षिण आफ्रिकन देशांशी असणारे संबंध कसे आहेत यासंबंधीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. 2011 मध्ये हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र्ााविषयीची माहिती चोरताना एका चिनी सायबर हॅकरला पकडण्यात आले होते. हिंदुस्थानचे आफ्रिका, नॅटो, मध्य आशियातील देशांशी संबंधांविषयीची माहितीही त्याने चोरली होती.

जगाला 5 जी नेटवर्क पुरवणारी हुवावे कंपनी हा चीनचा सर्वात मोठा गुप्तहेर आहे असे मानले जाते. या कंपनीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अनेक देशांत वापरले जातात. तिथून मोठय़ा प्रमाणावर माहिती चोरली जात आहे. हे लक्षात आल्याने अनेक प्रगत देशांनी या कंपनीवर बंदी घातली आहे.

हिंदुस्थानने चिनी गुप्तचर यंत्रणेपासून सुरक्षित राहण्यासाठी काही पावले उचलली आहेत, पण अद्यापही अनेक उपाय करणे नितांत गरजेचे आहे. हिंदुस्थानने टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना चिनी बनावटीचे हार्डवेअर वापरू नये असे बजावले आहे. याखेरीज हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांत (जसे की नेपाळ) असणारे शेकडो चायनीज स्टडी सेंटर्स हे हिंदुस्थानची माहिती काढण्याचे चीनचे मोठे स्थान आहे. त्यावर लक्ष ठेवून राहिले पाहिजे.

चीनने काही सॉफ्टवेअर्समध्ये ट्रोझन हॉर्स घालून हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र्ाांविषयीची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घेता हिंदुस्थानने सरकारी स्तरावरील आपली एकंदर संगणकप्रणाली सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य बनवणे गरजेचे आहे. तसेच हिंदुस्थानातील प्रत्येक चिनी नागरिकाकडे गुप्तहेर म्हणून पाहण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या