हृदयविकाराच्या धक्क्याने चिनी चोराचा मृत्यू

38

सामना ऑनलाईन । ठाणे

एका रत्नप्रदर्शनातून हिऱ्यांची चोरी करणाऱ्या चिनी चोराचा ठाणे येथील कारागृहात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली असून जाइंग चांगक्विंग असं या चोराचं नाव आहे.

ठाणे कारागृहाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाइंग हा आपलं जेवण घेण्यासाठी रांगेत उभा असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जागेवरच कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्याला त्वरीत कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे जाइंगला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून जाइंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

जाइंगने काही काळापूर्वी गोरेगाव येथे झालेल्या एका जेम एक्स्पोमधून सुमारे ३४ लाख आणि २.५ लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांची चोरी केली होती. या कृत्यात त्याला डेंग शिओबो या साथीदाराने मदत केली होती. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती. जाइंगच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी ठाणे कारागृहाने चिनी दुतावासाशी संपर्क साधला असून जाइंगची पत्नी आणि त्याचा भाऊ आल्यानंतर जाइंगवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या