ड्रॅगनची नवी खेळी! अरुणाचलच्या भूभागात घुसखोरी करीत उभारले सुसज्ज गाव

घुसखोर चीनची शेजारी देशांची जागा हडपण्याची खोडी काही थांबायचे नाव घेत नाहीय. भूतानच्या वन्य जमिनींवर अतिक्रमण केल्यावर चीनने आपले लक्ष आता हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशकडे वळवले आहे.

अरुणाचलच्या अप्पर सुबनगिरी जिह्यातील त्सारी चू गावात 4.5 कि.मी. आतपर्यंत घुसखोरी करीत चिनी प्रशासनाने 101 घरांचे सुसज्ज गाव वसवल्याचे उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. चीनचा हा गाव हिंदुस्थानच्या सुरक्षेला धोकादायक ठरू शकतो, असे वृत्त एका इंग्रजी टीव्ही वाहिनीने दिले आहे.

टीव्ही वाहिनीच्या वृत्तानुसार अरुणाचल प्रदेशचा अप्पर सुबनगिरी जिल्हा हिंदुस्थान आणि चीन यांच्यात जुना वादाचा विषय बनला आहे. त्यावरून अनेकदा उभय देशांच्या जवानांत सशस्त्र संघर्षही झाला आहे. आता उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रातील बांधकाम पाहता चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केल्याचे स्पष्ट होतेय, असे मत नकाशा तज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे लडाखच्या पश्चिम भागात हिंदुस्थानी आणि चिनी सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या असताना ड्रगॉनने हिंदुस्थानवर कुरघोडी म्हणून हे गाव वसवल्याचे हे तज्ञ म्हणत आहेत.

अरुणाचल प्रदेशच्या भाजप खासदाराने लोकसभेत दिला होता घुसखोरीचा इशारा

ताज्या वृत्तात दाखवण्यात आलेले अरुणाचल सीमेचे ताजे छायाचित्र उपग्रहाने 1 नोव्हेंबर 2020ला पाठवलेले आहे. या भागाच्या 1 वर्षांपूर्वीच्या छायाचित्रात गावाचा कोणताही मागमूसही नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात चीनने अरुणाचलचा साडेचार कि.मी. भूभाग बळकावून या नव्या गावाची उभारणी केली आहे, असे तज्ञांचे मत आहे.

नोव्हेंबरमध्ये अरुणाचलचे भाजप खासदार तापिर गावो यांनी लोकसभेत अरुणाचलच्या काही भागावर चीनने घुसखोरी केल्याचा इशारा दिला होता. त्यांनी आपल्या निवेदनात अप्पर सुबनगिरी जिह्याचा विशेष उल्लेख केला होता. खासदार गावो यांनी टीव्ही वाहिनीशी बोलताना अरुणाचल सीमेच्या आत चीनचे बांधकाम सुरू आहे. तुम्ही नदीच्या बाजूने पाहिलेत तर चीनने सुबनगिरी जिह्यात 60 ते 70 कि.मी. इतकी घुसखोरी केल्याचे दिसेल, असा गंभीर इशाराही दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या