चिरंजीवी भव!

1006

>> ज्योत्स्ना गाडगीळ

सोनू, मोनू, राजू, बाबू, बबलू, गट्टू अशा कित्येक निरर्थक टोपणनावांनी लोक बालपणी आपल्याला हाक मारतात. मोठेपणी त्याच टोपणनावांचा आपल्याला जाच वाटू लागतो. मात्र, मध्येच कोणीतरी आपल्याला `त्या’ नावे हाक मारली, की बालपणीचे मंतरलेले दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. त्या नावासोबत आठवणी जाग्या झाल्या, तरी ते रम्य बालपण आपल्याला परत आणता येत नाही. मात्र त्याला अपवाद ठरला आहे, एक मुलगा! ज्याने वयाची पंचविशी पूर्ण केली आहे, तरी आजही तो टोपण नावानेच ओळखला जातो. एव्हाना नोकरी शोधून, लग्न करून, स्थिरस्थावर व्हायचे सोडून तो अजूनही बालसुलभ क्रीडा करून सर्वांना आकर्षून घेत आहे. तो आहे, पूर्वी वृत्तपत्रातून तर आता फेसबुकवर भेटणारा हास्यचित्रमालिकेचा नायक `चिंटू!’

अलीकडच्या स्मार्ट पिढीतल्या (ओव्हर) स्मार्ट मुलांमध्ये `निरागस’ भाव शोधावे लागतात. चिंटू आधीच्या पिढीचा प्रतिनिधी होता आणि आताच्या पिढीचाही प्रतिनिधी आहे, तरी तो अजूनही निरागस आहे. १९९१ मध्ये त्याचा जन्म झाला. टीव्ही, कलर टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट फोन हा सगळा प्रवास त्यानेही पाहिलाय, अनुभवलाय; पण त्याच्या बालविश्वात बदल झालेले नाहीत. मैदानी खेळ, सुटीतली मजा, दिवाळीतले फटाके, परीक्षेचा अभ्यास, मित्रांशी भांडणे ह्या बालवयात अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टींचा तो मनमुराद आनंद घेतो आणि आपल्यालाही देतो. हा संस्कारी मुलगा घडला आहे, प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित आणि लेखक प्रभाकर वाडेकर ह्यांच्या तालमीत! तो त्यांच्या `शब्दा’बाहेर नाही आणि `रेषे’बाहेरही नाही. तीन वर्षांपूर्वी प्रभाकर वाडेकर ह्यांचे निधन झाले, परंतु चारुहास पंडित यांनी चिंटूचे एकल पालकत्व स्वीकारून आजही त्याचे संगोपन सुरू ठेवले आहे.
`चारुहास पंडित/ प्रभाकर वाडेकर’ ह्यांच्या नावे सुरू झालेली `चिंटू’ ही हास्यचित्र मालिका सलग २३ वर्षे `सकाळ’ आणि काही काळ `लोकसत्ता’ वृत्तपत्रातून छापून येत होती. २०१३ मध्ये वाडेकर ह्यांचे आकस्मिक निधन झाले, तेव्हा चारुहास पंडित ह्यांनी चिंटू मालिका थांबवण्याचा निर्णय घेतला. पण ह्या निर्णयामुळे चिंटूचे चाहते आणि खुद्द चारुहास पंडितदेखील अस्वस्थ झाले. म्हणून १ एप्रिल २०१४ रोजी त्यांनी चिंटूचे सोशल मीडियावर पुनरागमन केले. त्याच्या येण्याने लाखो चाहते खूष झाले. त्याला परत आणणे, ही वाडेकरांना श्रद्धांजली होती, असे चारुहास पंडित सांगतात.
चिंटूचे जन्मदाते चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे दोघेही वृत्तपत्र व्यवसायात होते. पंडित ह्यांनी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून `उपयोजित कला’ (कमर्शिअल आर्ट) विषयात पदवी प्राप्त केली, तर वाडेकरांनी वाणिज्य शाखेतून! वाडेकरांचा लेखनाकडे जास्त कल होता. पंडित ह्यांना `सकाळ’ वृत्तपत्रात तर वाडेकर ह्यांना `इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रात नोकरी मिळाली. व्यावसायिक कामानिमित्त दोघांची परस्परांशी ओळख झाली. `निखळ विनोद’ हा त्या दोघांना जोडणारा दुवा होता. ते दोघे एकत्र मिळून विनोदी मालिका, चित्रे, कथा, लेख ह्यांचा रसास्वाद घेत असत.

वृत्तपत्रातील गंभीर स्वरूपाचे मथळे, माहिती, बातम्या, लेख पाहता वाचकांना थोडा विरंगुळा मिळावा, म्हणून हास्यचित्रमालिका सुरू करावी असे त्या दोघांना वाटत असे. त्यापूर्वी इंग्रजी वृत्तपत्रातून तशा स्वरूपाच्या मालिका प्रकाशित होत असत, त्यावर पाश्चिमात्य संस्कृतीची छाप दिसत असे. या पाश्र्वभूमीवर हिंदु्स्थानी हास्यचित्र मालिका सुरू करावी व त्यातील पात्रे सर्वसामान्यांना आपलीशी वाटावी, असे त्या दोघांनाही वाटत होते. एकदा `सकाळ’चे तत्कालीन संपादक विजय कुवळेकर ह्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडण्याची पंडित ह्यांना संधी मिळाली. वानगीदाखल त्यांनी वाडेकरांसोबत तयार केलेली ४-५ व्यंगचित्रे कुवळेकरांना दाखवली. त्यांचा होकार आल्यास महिनाभराचा साठा करून मग मालिका सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. ते दोघेही उत्तराच्या प्रतीक्षेत असताना कुवळेकर ह्यांनी दुसऱ्या दिवसापासून ही मालिका सुरू करणार असल्याचे सांगितले. आपले स्वप्न साकार होत असल्याचा त्यांना आनंद झाला, तरी ती जबाबदारी आता समर्थपणे पेलावी लागणार ह्याचे त्यांना थोडे दडपण आले. पण चिंटूची प्रतिमा त्यांच्या मनात एवढी कोरली गेली होती, की ती मालिका सुरू झाल्यापासून २३ वर्षे अविरतपणे सुरू राहिली.

हे सातत्य टिकवून ठेवण्यामागचे गुपित विचारले असता चारुहास पंडित सांगतात, ‘चिंटू आमच्या मनात एवढा घोळला होता, की त्याचे पहिले स्केच काढताच फायनल झाले. तो निरागस दिसत होता, पण त्याच्या कपाळावर आलेली बट त्याच्यातला खोडकरपणा दाखवत होती. चिंटूबरोबरची सगळी पात्रे स्वतःची देहबोली घेऊन आली. ते स्वत: विनोद सुचवतात, असे आम्हाला जाणवत असे. आधी चित्र मग शब्द असे काही ठरलेले नसे. रोज सकाळी आम्ही भेटायचो, सहज गप्पा मारायचो, त्यातून वेगवेगळे विषय निघायचे. दैनंदिन विषयांचा त्यात समावेश असे. जसे की आंब्याला मोहोर येणे, पावसाळ्यात चिंटूचे चिखलाचे पाय घरात येणे, हिवाळ्यात व्यायाम करणे, नवीन वर्षाचे संकल्प करणे, ते फिसकटने, रोजचा अभ्यास, परीक्षा, कुत्रा पाळण्यासाठी हट्ट इ. या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असल्याने त्यासाठी विशेष निरीक्षणाची गरज कधीच लागली नाही. तीच सहजता आमच्या कामात आली. दडपण न घेता कामाचा आनंद आम्ही घेऊ शकत होतो म्हणून ते बघणाऱ्यालाही देऊ शकत होतो. मुलांना विनोदाची गोडी लावणे ह्या उद्देशाने आम्ही ह्या उपक्रमाची सुरुवात केली नाही. पण सर्व वयोगटातील लोकांना स्वच्छ, निखळ, निरागस विनोद कळावेत हा उद्देश होता. चिंटूमुळे मुले मराठी वृत्तपत्रे वाचायला लागली, हे पालकांनी, मुलांनी आम्हाला सांगितले. आजवर प्रकाशित झालेल्या निवडक हास्यचित्रकथा आम्ही पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या आहेत. ती पुस्तकेदेखील अनेक घरांतून तसेच हॉस्पिटलमधूनही दिसू लागली. कारण पुस्तकाचे कोणतेही पान काढले तरी त्यातील शब्द, चित्र ह्यांचा आनंद वाचक घेऊ शकत होते आणि आजही घेत आहेत. चित्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यातील चैतन्य टिकवून ठेवण्याचा आम्ही नेहेमी प्रयत्न केला.’’
चिंटू ही हास्यचित्रमालिका असली, तरी त्यात दरवेळी शब्द असतीलच असे नाही, कधी कधी शब्दविरहित चित्रातूनही विनोदनिर्मिती घडवली जाते. तीन कॉलम बाय ५ सेमी एवढाच त्या हास्यमालिकेचा कॅनव्हास असला तरी त्याच्याशी वाचकांना दररोज जोडून ठेवायचे, हे त्या दोघांसमोर नेहेमीच आव्हान असे. कल्पना सुचल्यापासून ती साकारायला चार तास लागत असत आणि वाचक दोन सेकंदात त्याची मजा लुटून घेत असत. परंतु चित्रातील गंमत लोकांना कळावी, म्हणून चित्रकला कार्यशाळा, कार्यक्रम, समारंभ अशा प्रसंगी बोलण्याची संधी मिळाल्यास रसिकांना चित्रसाक्षर करण्याचे काम चारुहास पंडित नेहेमी करत असत. ते सांगतात, `व्यंगचित्रकार हा उत्तम छायाचित्रणकार (सिनेमॅटोग्राफर) असावा लागतो. त्याला चित्राकडे विविध बाजूंनी, दिशांनी कॅमेरा अँगलने बघता आले पाहिजे, चित्रातील व्यक्तिरेखेची देहबोली कशी असेल याची कल्पना करण्यासाठी त्याला दिग्दर्शनाची उत्तम जाण असली पाहिजे, चेहऱ्यावरील हावभाव अचूक टिपण्यासाठी अभिनयाची जाण असली पाहिजे. हे सर्व बारकावे चित्रात उतरतात तेव्हा खरी रसोत्पत्ती होते.’
चिंटू बरोबर त्याच्या घरच्यांनी, मित्रपरिवाराने त्या मालिकेला पूर्णत्व दिले आहे. चिंटूचा मित्र पप्पू, गुंड वृत्तीचा राजू, लुकडा-धांदरट बगळ्या, चिंटूचा छोटा भाऊ वाटावा असा शेजारी राहणारा सोनू, सुटीत येणारे आजी आजोबा, शेजारच्या जोशी काकू, सतीश दादा, मिनी हे सगळे आता आपल्या घरचेच वाटू लागले आहेत, नव्हे आपल्यातलेच वाटू लागले आहेत. हेच या हास्यचित्रमालिकेचे यश आहे. म्हणून आजही ती आपली लोकप्रियता टिकवून आहे. चिंटू महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारतातील घराघरात पोहोचावा म्हणून पंडित ह्यांनी फेसबुकवर मराठी चिंटूच्या बरोबरीने इंग्रजी संवादातील चिंटू मालिकेलाही सुरुवात केली आहे. मराठी चिंटू पेजला ४ लाखाहून अधिक, तर इंग्रजी चिंटूला ४०,००० हून अधिक पसंती मिळाली आहे. बालदोस्तांच्या मनावर चिंटूची प्रतिमा कोरली जावी म्हणून श्रीरंग गोडबोले ह्यांच्या दिग्दर्शनाखाली चिंटू चित्रपट प्रकाशित झाला होता. त्यालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. आता स्मार्टफोनधारक असलेल्या मुलांपर्यंत चिंटू पोहोचावा म्हणून चारुहास पंडित हास्यचित्रमालिकेचे छोटे छोटे अॅनिमेटेड व्हिडीओ तयार करणार आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर भविष्यात चिंटूवर आधारित कार्टून मालिकाही निघण्याची शक्यता आहे.

चारुहास पंडित ह्यांनी चिंटूपूर्वीही शालेय पाठ्यपुस्तकांतून तसेच इतर बालसाहित्यातून बालविश्वावर आधारित चित्रे काढल्यामुळे त्यांचा बालचित्रकथांशी ऋणानुबंध जुळला होता, चिंटूच्या निमित्ताने ते नाते अधिक घट्ट झाले. शालेय मुलांसाठी त्यांनी जुलै ते जून अशा शैक्षणिक वर्षाची दिनदर्शिकाही प्रकाशित केली आहे. यंदाचे तिचे चौथे वर्ष आहे. ही दिनदर्शिका मुलांना वेळेचे नियोजन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि चिंटूच्या तोंडून सामाजिक प्रबोधनाच्या गोष्टी शिकवणारी आहे. चिंटूव्यतिरिक्त पंडित ह्यांचा काष्ठचित्रांचा पुण्यात स्वतंत्र व्यवसाय आहे. त्या व्यवसायालाही वेळ देता यावा, म्हणून त्यांनी दर दोन दिवसाआड चिंटू प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. आता चिंटू `पाणी वाचवा’, `गड-किल्ले जपा’, `वृक्षसंवर्धन करा’ असे संदेशही देऊ लागला आहे. त्याचे निष्काम भाव आपल्याला विचार करायलाही भाग पाडतात. पण काही झाले, तरी चिंटूने नेहेमी खोडकर, निरागस, कधी स्मार्ट तर कधी बावळटपणे वागून आपले प्रतिबिंब त्याच्यातून नेहेमी दाखवावे, हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल. म्हणून सर्वांच्या वतीने त्याला आशीर्वाद देऊया, `चिरंजीवी भव!’

आपली प्रतिक्रिया द्या