राष्ट्रवादीतील कलह : सुप्रिया सुळेंसमोरच शेखर निकम – भास्कर जाधव भिडले

172

सामना प्रतिनिधी, चिपळूण

चिपळूण राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच बुधवारी चव्हाट्यावर आला. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारीच समोरा समोर भिडल्याने सुप्रिया सुळे हतबलच झाल्या. हमरातुमरीवर आलेल्या भास्कर जाधव – शेखर निकम यांना कसे आवरावे हेच त्यांना सुचत नव्हते

बुधवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने सावर्डे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार होत्या. मेळाव्याच्या सुरुवातीस स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर जिल्ह्याचे प्रभारी भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पदे रिक्त असून रिक्त पदांमुळे पक्षाला हानी पोचत असल्याचे भाष्य त्यांनी करताच जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जाधव यांना भाषण सुरु असतानाच रोखले व याला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्हालाच विचारून प्रत्येक निर्णय व नियुक्ती केली जात असताना तेच तेच मुद्दे का उगाळत बसता? असे खडे बोल सुनावल्याने जाधव संतप्त झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे हमरातुमरी आणि शाब्दिक चकमक सुरु झाली. हा सर्व प्रकार सुप्रिया सुळे मौन बाळगून हतबल होऊन पाहत होत्या. दोघानाही कसे आवरावे हेच त्यांना सुचत नव्हते.

जिल्हाध्यक्ष शेखर निकम हे शांत, संयमी व मितभाषी म्हणून प्रसिद्ध असून बुधवारच्या मेळाव्यात मात्र निकम यांचा संयम सुटला. प्रत्येकवेळी भास्कर जाधव यांची हमरा तुमरी पक्ष कार्यकर्त्यांना नवी नाही. जिल्ह्यात दिवसागणिक राष्ट्रवादीची अवस्था दयनीय होत असताना वरिष्ठ पदाधिकारीच कार्यकर्त्यांसमोर भिडल्याने सामान्य कार्यकर्ते नाराज आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या