पोलीस आयुक्तांची प्रतिक्षा संपली, चिरंजीव प्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरात झालेल्या दंगलीत दोन निरपराधांचा जीव गेल्यानंतर तसेच तब्बल दहा कोटींची मालमत्ता जळून खाक झाल्यानंतर अखेर अडीच महिन्यानंतर शहराला कायमस्वरूपी पोलीस आयुक्त दिले. गृहविभागाने नांदेडचे पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब केले. संवेदनशील असलेल्या संभाजीनगरांची कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणून जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

अडीच महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे कचरा प्रश्नावरून दंगल झाली. पोलिसांनी दंगल आटोक्यात न आणता चक्क आंदोलकांवर दगडपेâक केली होती तसेच परिस्थितीr हाताळण्यात पोलीस दल कमी पडल्याचा ठपका ठेवून मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना १५ मार्च रोजी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावर विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. या दरम्यान शहरात किरकोळ कारणावरून धर्मांधांनी दंगल पेटवली होती. दंगलीत एका वृद्धाचा होरपळून तर एका मुलाचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शहरात दंगल उसळल्याचा तसेच दंगल आटोक्यात आणण्याात पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी केला होता. शहरात पूर्णवेळ आयुक्त नसल्याने पोलीस दलात काही दलालांची चांदी होत होती. त्यामुळे खात्यांतर्गत बेचैनी वाढत चालली होती. लोकप्रतिनिधींनीदेखील शहराला कायमस्वरूपी आयुक्त देण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती.

माफिया, वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यावर वचक ठेवण्याचे आव्हान
शहरात अव्यवस्था बोकाळलेली आहे. माफिया, वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. शहरात माफियाराज कार्यरत असल्याने पोलीस दलाचे खच्चीकरण होत आहे. गेल्या सहा महिन्यांत तीनवेळा आंदोलनाच्या नावावर पोलिसांवर हल्ले करण्यात आले आहे. पोलिसांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याची जबाबदारी नवीन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यावर राहणार आहे. १९९६ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले प्रसाद यांनी २००२ ते २००४ या काळात संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना त्यांनी छत्तीसगड आणि बिहारमधील नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. सध्या ते नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते.