संजय राठोडना मंत्रीपद देणे दुर्दैवी! भाजपच्या चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून स्थापन केलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. या मंत्रिमंडळात संजय राठोड यांनाही स्थान मिळाले आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी हेच संजय राठोड अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले होते.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. वाघ यांनी एक ट्विट केलं असून त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे, माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे ‘

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून त्यावेळच्या विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आल्यानंतर संजय राठोड यांनी वनमंत्री मंत्रीपदाचा दिला होता. हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला होता. संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा 28 फेब्रुवारी रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राजभवनावर पाठवण्यात आले होते. यासंदर्भात राजभवनातून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले होते.

पुणे शहरातील वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (वय 22) हिने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या आई- वडिलांनी वानवडी पोलीस ठाण्यात जबाब नोंदविला होता. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात आमचे कोणावरही आरोप नाहीत, तिच्या मृत्युनंतर या प्रकरणात राजकारण केले गेले. पूजाच्या मृत्युनंतर जे काही घडले ते राजकीय हेतूने केले गेले होते, असा जबाब पूजाच्या आई-वडिलांनी नोंदविला होता.

पुण्यातील वानवडी परिसरात पूजा चव्हाणने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वानवडी पोलीसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी पहिल्या दिवसापासून आमची कोणाविरूद्धही तक्रार नसल्याचा जबाब दिला होता.