46 कोटींची रोकड, 3 किलो सोनं अन् 152 किलो चांदी, राजस्थानमधील मंदिराला भक्तांकडून विक्रमी दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील प्रसिद्ध कृष्णधाम असलेल्या मांडफिया येथील श्री सांवालिया सेठ मंदिरात भाविकांनी पुन्हा एकदा मोठ्या श्रद्धेने दानाचा वर्षाव केला आहे. मंदिराच्या मासिक तिजोरी गणनेचा सातवा आणि शेवटचा टप्पा नुकताच पार पडला असून, यामध्ये कोट्यवधी रुपयांचे रोख उत्पन्न आणि मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू जमा झाले आहेत. मंदिर प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, यावेळच्या दानपेटीतून 36 कोटी 57 लाख 87 हजार रुपयांची रोकड प्राप्त झाली आहे. याशिवाय मंदिर प्रशासनाच्या देणगी कक्षात आणि ऑनलाइन स्वरूपात 10 कोटी 45 लाख 28 हजार रुपयांचा निधी जमा झाला असून, एकूण देणगीचा आकडा 46 कोटी 58 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

केवळ रोख रक्कमच नव्हे, तर भाविकांनी सोन्या-चांदीच्या रूपातही आपली श्रद्धा अर्पण केली आहे. मोजणीदरम्यान 2 किलो 967 ग्रॅम सोने आणि तब्बल 152 किलो 609 ग्रॅम चांदी देणगी म्हणून प्राप्त झाली आहे. सांवालिया सेठ मंदिराचे हे वाढते उत्पन्न भाविकांच्या अलोट श्रद्धेची प्रचिती देत आहे. चित्तोडगढ-उदयपूर महामार्गावर स्थित असलेले हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे, तर गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीसह देशभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे.

येथे भगवान श्रीकृष्णाच्या ‘सांवालिया’ म्हणजेच गडद रंगाच्या मोहक मूर्तीची पूजा केली जाते. या मूर्तीचा इतिहास अत्यंत रंजक असून, 1840 मध्ये भोलाराम गुर्जर नावाच्या एका गोपाळाला पडलेल्या दृष्टांतानुसार बागुंड गावातील जमिनीतून तीन मूर्तींचे उत्खनन करण्यात आले होते. त्यांपैकी एक मूर्ती मांडफिया येथे स्थापित करण्यात आली. विशेष म्हणजे, ही मूर्ती संत मीराबाईंनी पूजलेली तीच प्रतिमा असल्याचे मानले जाते. व्यापारी समुदायामध्ये या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. अनेक व्यापारी सांवालिया सेठला आपल्या व्यवसायातील भागीदार मानतात आणि नफ्याचा ठराविक हिस्सा येथे अर्पण करतात. प्रामाणिक श्रद्धेने व्यवसायात वृद्धी आणि जीवनातील संकटे दूर होतात, अशी या मंदिराची ख्याती आहे.