एअरलिफ्ट करताना चेन तुटली अन् हेलिकॉप्टर हजारो फुटांवरून कोसळलं; केदारनाथमधील दुर्घटनेचा Video व्हायरल

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. हवाईदलाचे एमआय-17 हे हेलिकॉप्टरने एक खराब झालेले हेलिकॉप्टर घेऊन जात होते. त्याचवेळी एअरलिफ्ट केलेल्या हेलिकॉप्टरची चेन तुटली आणि हेलिकॉप्टर खाली कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हजारो फुटांवरून कोसळल्याने हेलिकॉप्टरचा चुराडा झाला. हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुर्घटना कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे.

द इकोनॉमीक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. तांत्रिक कारणांमुळे हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने ते तिथून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. हवाईदलाच्या एमआय-17 या हेलिकॉप्टरद्वारे बिघाड झालेले हेलिकॉप्टर गोचर येथे उचलून नेले जात होते. मात्र याचवेळी हेलिकॉप्टरला जोडलेली चेन तुटली आणि हेलिकॉप्टर लिंचोली येथील मंदाकिनी नदीजवळ कोसळले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

केदारनाथ येथून खराब झालेले हेलिकॉप्टर गोचर हेलिपॅडकडे घेऊन जात असताना लिंचोली येथे हेलिकॉप्टर कोसळले. शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या बचाव पथकाला ही माहिती मिळाली. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने ‘एएनआय’ला दिली.