रामनरेश कोरोनापेक्षा घातक! ख्रिस गेल अजूनही विधानवर ठाम

1449

रामनरेश सरवन हा ‘कोरोनापेक्षा घातक आहे’ अशी टीका स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने काही दिवसांपूर्वी केली होती. गेल आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या संदर्भात गेलची प्रतिक्रिया असणारे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेअसून यानंतर कॅरेबियन प्रिमीयर लीग (CPL) ने वादावर पडदा टाकण्याचं ठरवलं आहे. गेल याने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीजच्या संघातील एकेकाळचा त्याचा सहकारी रामनरेश सरवन याच्यावर कडवट शब्दात टीका केली होती. तो करोनापेक्षा भयंकर आणि घातक असल्याचं त्याने म्हटलं होतं. वेस्ट इंडीजमधल्या एका प्रिमिअर लीग स्पर्धेतील ‘जमैका तल्हवाज’ नावाच्या संघाने गेलला वगळलं होतं. रामनरेश सरवन हा या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असून त्यानेचहे सगळं घडवून आणलं असल्याचा आरोप गेल याने केला आहे.

ख्रिस गेल याने आपल्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडीओद्वारे त्याने त्याचा एकेकाळचा संघातील सहकारी आणि माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवनवर स्फोटक आरोप केले होते. सरवनने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. कॅरेबियन प्रिमीयर लीगच्या तांत्रिक समितीचे प्रमुख पी.जेपॅटरसन यांनी या वादासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की गेलने या सगळ्या वादामुळे वेस्ट इंडीज क्रिकेटची मोठी बदनामी झाली असून कॅरेबियन प्रिमीयर लीगच्या ब्रँडलाही धक्का बसला आहे. मात्र त्याचवेळी गेलने आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटलंय की ” मला मिळालेल्या वागणुकीमुळे मी जी वक्तव्ये केली होती त्यावर मी आजही ठाम आहे. मी जे काही बोललो होतो ते मनापासून बोललो होतो. मात्र माझ्या विधानातील काही हिस्सा हा वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी आणि कॅरेबियन प्रिमीयर लीगच्या ब्रँडच्या दृष्टीने हानी पोहचवणारा ठरू शकतो असे मला वाटते आहे”

गेलने त्याच्या विधानांबाबत बोलताना म्हटले आहे की जमैकामधील त्याच्या चाहत्यांना जमैका तल्हवाज संघातून तो का खेळत नाही हे कळावं यासाठी व्हिडीओ चित्रीत केला होता. गेलचं म्हणणं आहे की त्याने या स्पर्धेमध्ये जमैकाच्या संघाला 2 वेळा अजिंक्यपद मिळवून दिलं असून या लीगमधील कारकिर्दीचा अंत जमैकामध्येच व्हावा अशी त्याची इच्छा होती. पॅटरसन यांनी प्रयत्न केल्याने आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे गेलने प्रसिद्धीपत्रकात त्याची भूमिका मांडल्याने हा वाद संपल्याचं कॅरेबिअल प्रिमिअर लीगतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. गेलवर यामुळे कारवाई होणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या