मैदानावरील ‘वादळ’ शमले! अखेरच्या डावातही ख्रिस गेलची विस्फोटक खेळी

1027

ख्रिस गेल नावाचे वादळ अखेर शांत झाले आहे. गोलंदाजांना भितीने कापरे भरवणारा, चेंडूची शिलाई उधडून टाकणारा वेस्ट इंडीजचा विस्फोटक खेळाडू गेल बुधवारी आपला अखेरचा डाव खेळला. अखेरचा डावही गेलने आपल्या विस्फोटक खेळीने गाजवला. शेवटच्या एक दिवसीय लढतीत गेलने 41 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केली.

ख्रिस गेलने आपल्या शेवट्या खेळीदरम्यान 8 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. गेलने अर्धशतकीय खेळी करत विंडीजचा दमदार सलामी मिळवून दिली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईकरेट होता 175.61 एवढा. खलिल अहमदने विराटकरवी गेलला बाद करत अखेरच्या डावात त्याला पवेलियनचा रस्ता दाखवण्याचा मान पटकावला. मैदानाच्या बाहेर जाताने गेलने आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये सर्वांना अभिवादन केले. गेलने बॅटवर हेल्मेट ठेऊन ती उंचावली आणि सर्वांचे अभिवादन स्वीकारले.

गेलची कारकीर्द
ख्रिस गेलने वेस्ट इंडीजकडून विक्रमी 301 एकदिवसीय लढतीत खेळताना 10,480 धावा केल्या. यात त्याच्या 25 शतकांचा आणि 54 अर्धशतकांचा समावेश आहे. षटकारांचा बादशहा असलेल्या गेलने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 331 षटकारांची आतिषबाजी केली आहे. एक दिवसीय सह 103 कसोटीत गेलने 7014 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये 333 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या