चर्चिलची आवडती गुप्तहेर क्रिस्टीनी ग्रॅनविली

>> प्रतीक राजूरकर

क्रिस्टीनीची माहिती खरी ठरली. जर्मनीने रशियावर हल्ला केला. ब्रिटिश सरकारने तिच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. क्रिस्टीनीवरील संशयाचे मळभ दूर झाल्याने क्रिस्टीनीला 1944 साली दक्षिण फ्रान्सला पाठवण्यात आले.  फ्रान्स मधील नाझी सैन्या विरोधात लढणाऱ्यांना सहाय्य करण्याची जबाबदारी क्रिस्टीनीवर सोपवण्यात आली. क्रिस्टीनीला पाॅलीन हे सांकेतिक नाव देण्यात आले. क्रिस्टीनीच्या एकूण धडाडीने ती अल्पावधीतच फ्रान्स मध्ये लोकप्रिय ठरली ती पाॅलीन नावाने. तिचे कार्य जोखमिचेच होते. फ्रान्स मध्ये जर्मन सैन्याचा प्रभाव होता. इटलीच्या सीमेवर क्रिस्टीनी हेरगिरी साठी गेली असता दोन जर्मन सैनिकांनी तिला थांबवले. तिला बंदुकीच्या टोकावर हात वर करण्याचे आदेश त्या सैनिकांनी दिले. जर्मन सैनिकांना क्रिस्टीनीने हात वर केल्यावर तिच्या बगलेत दोन हँड ग्रेनेड दिसले. त्याची पिन काढली असल्याचा क्रिस्टीनीने दोन सैनिकांना इशारा दिला हे ऐकताच जर्मन सैनिकांनी तिथून पळ काढला. दुसऱ्या एका प्रसंगात गस्त घालत असलेले जर्मन सैन्य पथक असल्याचा क्रिस्टीनीला लक्षात आले. त्यांच्या तावडीत सापडू नये म्हणून क्रिस्टीनी एका झुडपात लपली. मात्र गस्ती पथका समवेत असलेल्या जर्मन शेफर्ड श्वानाला झुडपात तिचा सुगावा लागला. जर्मन शेफर्डने क्रिस्टीनी समक्ष लोटांगण घातले. झुडपातून क्रिस्टीनीने चित्र विचित्र आवाज काढून गस्ती पथकाची दिशाभूल करुन स्वतः चा जीव वाचवला. क्रिस्टीनीचे धाडस पराक्रम व समयसूचकता आदर्श गुप्तहेराला साजेशीच होती. त्याची प्रचीती तिच्यावर ओढावलेल्या अनेक प्रसंगातून वेळोवेळी येते. कुठल्याही प्रसंगाला संयमाने सामोरे जाऊन यश मिळवता येणे हे सर्वश्रुत असले तरी अनेकांना आत्मसात करता येत नाही.

अजून एका प्रसंगात क्रिस्टीनीने जर्मन सैन्याच्या तुरूंगात असलेल्या एका फ्रेंच अधिकाऱ्याला नाट्यमय परिस्थितीत बाहेर काढले. फ्रांसिस व त्याचा सहकारी झॅन या फ्रेंच अधिकाऱ्यांना जर्मन सैनिकांनी एका नाकाबंदीत अटक करून तुरूंगात डांबले होते. जर्मन गेस्टापो विभागाच्या अधिकारातील तुरूंग असल्याने तिथून अटकेतील लोकांचा मृतदेह देखील बाहेर पडणे अशक्य होते. मात्र अशक्य असा पराक्रम दाखवत क्रिस्टीनीने त्यांना सुखरूप जिवंत बाहेर काढले. अटकेची बातमी कळताच क्रिस्टीनीने सायकलवरून 40 किमी चे अंतर तातडीने पार करत तुरूंग गाठले. तिथे पोहचल्यावर तुरूंगाच्या भोवताल फ्रांसिस आणि क्रिस्टीनीच्या माहितीतले गाणे गात क्रिस्टीनी तुरुंगाभोवती घिरट्या घालू लागली. तुरुंगाच्या आतून फ्रांसिसकडून सुद्धा क्रिस्टीनीच्या गाण्याला दुजोरा मिळाला. फ्रांसिस याच तुरूंगात बंदिस्त असल्याची खात्री झाल्यावर क्रिस्टीनीने आपली पुढील योजना अंमलात आणली. तो अर्थातच क्रिस्टीनीने खेळलेला जुगारच म्हणावा लागेल. त्यात अपयश आल्यास क्रिस्टीनीला सुद्धा त्याच तुरूंगात डांबण्याची शक्यता होती.

क्रिस्टीनीने तुरूंग अधिकाऱ्याची भेट घेऊन आपण फ्रांसिसची पत्नी असल्याचे सांगितले व आपण ब्रिटिश जनरलची भाची असल्याचे सांगत आपला परिचय दिला. काही वेळातच ब्रिटिश सैन्य हल्ला करण्याच्या मार्गावर होते. याची क्रिस्टीनीने तुरूंग अधिकाऱ्याला जाणीव करून दिली. क्रिस्टीनीने तुरूंग अधिकाऱ्यांना  प्रस्ताव दिला की अटकेतील फ्रांसिस व त्याच्या सहकाऱ्यांची सुटका केल्यास तुरूंगातील जर्मन अधिकाऱ्यांना अभय देण्यात येईल. तत्पूर्वी फ्रांसिस व सहकाऱ्यांना कुठलीही इजा करण्यात येऊ नये. एका बेल्जियम अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने क्रिस्टीनीने दोन लक्ष फ्रँक जर्मन तुरूंग अधिकाऱ्यांना देण्याचे व त्या बदल्यात फ्रांसिस व सहकाऱ्यांची सुटका करावी हे निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे तुरूंग अधिकाऱ्यांनी फ्रांसिस व त्याच्या सहकाऱ्याना तुरूंगाबाहेर काढले. त्यामुळे फ्रांसिसला आपला मृत्यू समीप आल्याचा समज झाला. फ्रांसिस व सहकाऱ्यांना एका गाडीत बसवण्यात आले. फ्रांसिस व सहकारी यांना त्या दिवशी मृत्यू दंडाची शिक्षा निश्चित करण्यात आली होती. थोड्या अंतरावर गेल्यावर रस्त्याच्या शेजारी क्रिस्टीनी त्यांची वाट बघत उभी होती. क्रिस्टीनीला बघून फ्रांसिसला आनंदाचा सुखद धक्का बसला. फ्रांसिस व सहकारी यांना बाहेर काढण्यागोदर ब्रिटिश व संयुक्त राष्ट्रांचे सैन्य तळावर पोहचले होते. त्यामुळे कैदेतील फ्रांसिस व सहकारी व ठरलेल्या वाटाघाटीनंतर तुरुंगाधिकारी अशी दोघांची सुटका करण्यास क्रिस्टीनी यशस्वी ठरली. संधीचा फायदा घेत क्रिस्टीनीने पुन्हा एकदा ती चर्चिलची आवडती गुप्तहेर का होती?  हे सिध्द करुन दाखवले

दुसऱ्या महायुद्धात पुढे घडलेल्या अनेक घडामोडी संयुक्त राष्ट्र जर्मनीवर वरचढ ठरू लागले. ब्रिटिश सरकारने क्रिस्टीनीला तात्पुरता महिला वायू दलात प्रवेश दिला. पुढील मोहिमेसाठी क्रिस्टीनीला इटली तेथे पाठविण्यात आले. मात्र रशियाचे आग्रहाखातर पुढील सर्व गोपनीय मोहिमा रद्द करण्यात आल्या. कायरोला मुख्यालयात परतल्यावर क्रिस्टीनीला विशेष कृतीदलाने डिसेंबर 1945 या एक वर्षाचे वेतन देण्याचे निश्चित केले. गुप्तचर मोहिमा रद्द झाल्याने विशेष कृतीदल बंद करण्याचा निर्णय झाला होता. क्रिस्टीनीला आपली आई नाझी तुरूंगात मरण पावल्याचे समजले. मूळची पोलंडची नागरिक असलेली क्रिसटिनी पोलंडला परतण्यास अनुत्सुक होती. आईचे निधन व पोलंडवर रशियाचा असलेला ताबा ही क्रिस्टीनीच्या पोलंडला परत न जाण्याची दोन मुख्य कारणे होती. आपला प्रियकर जर्मनीत असल्याने तिथे सुद्धा क्रिस्टीनीला जाणे शक्य नव्हते. विशेष कृतीदल बंद झाल्याने क्रिस्टीनीसाठी आता ब्रिटिश नागरिक होणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी ब्रिटिश सरकारला ब्रिटिश नागरिक होण्यासाठी अर्ज केला. परंतु युद्ध परिस्थितीमुळे क्रिस्टीनीचा नागरिकत्वाच्या अर्जावर निर्णय होत नव्हता. वास्तविक क्रिस्टीनीने ब्रिटिश गुप्तहेर खात्यासाठी केलेली अलाैकिक कामगिरी बघता तिला तात्काळ नागरिकत्व बहाल करण्यात यायला हवे होते मात्र उशिरा का होईना तिने अर्ज केल्यानंतर एक दिड वर्षानंतर तिला ब्रिटिश नागरिकत्व देण्यात आले.

सहा वर्ष साहसी धाडसी गुप्तहेर म्हणून काम केलेल्या क्रिस्टीनीला मोठी आर्थिक चणचण भासत होती. काही लेखकांनी क्रिस्टीनीने ब्रिटिश सरकारचा नौकरीचा प्रस्ताव नाकारल्याचे नमूद केले आहे. मात्र क्रिस्टीनीने ती का नाकारली याबाबत एक वाक्यता नाही. आर्थिक कारणास्तव क्रिस्टीनीने लहान कामे सुरु केली. इलेक्ट्रीक बोर्ड आॅपरेटर, दुकानात सेल्स गर्ल या सारख्या नौकरीतून उत्पन्न मिळवू लागली. फ्रान्स, ब्रिटनने दिलेले अनेक मानाचे पुरस्कार क्रिस्टीनीचे आर्थिक पोषण करु शकत नव्हते. ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यावर सहाजिकच ब्रिटनला स्थायिक झाली. क्रिस्टीनीच्या प्रेम प्रकरणांबाबत अनेक लेखकांनी लिहिले आहे. मात्र त्याबाबत संदर्भ फारसे उपलब्ध नाहीत. काहींच्या मते क्रिस्टीनी जेम्स बाँडचे लेखक इयान फ्लेमिंग सोबत असल्याचे लिहिले आहे. फ्लेमिंगची पहिली कादंबरी कसिनो रोयाल (1953) मधील व्यक्तिरेखा वेस्पर ही क्रिस्टीनी पासून प्रेरित आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. क्रिस्टीनीचे वडील तिला लहानपणी प्रेमाने वेस्पर नावाने बोलवायचे. काहींनी मात्र फ्लेमिंग व क्रिस्टीनीचे प्रेम संबंध होते ह्याबाबतीत संदर्भ नसल्याकडे लक्ष वेधले आहे. 1951 साली क्रिस्टीनीचा लहानसा अपघात झाला. एका वाहनाच्या धडकेत क्रिस्टीनी जखमी झाली. त्यातून ती सावरली परंतु त्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण झाले. The Spy who loved: The secrets and lives of Christine Granville या क्लेअर म्यूले यांनी लिहिलेल्या पुस्तकात क्रिस्टीनी बाबत अनेक गुपीतं आहेत. ब्रिटिश पत्रकार पिटर लेविस यांनी एक गुप्तहेर सकाळी न्याहारीला असलेली फार थोडे पुरुष रात्रीच्या जेवणा पर्यंत तिच्या सोबत टिकायची (The spy who had men for breakfast but few of them lasted till dinner) असे विश्लेषण केले आहे.

अखेर क्रिस्टीनीने 1951 साली एका जहाजावर नोकरी पत्करली. जहाजावरील क्रिस्टीनीचा एक सहकारी जाॅर्ज म्यूल्डाॅवने तिच्या प्रेमात पडला. काही लेखकांनी त्यांचे प्रेम संबंध होते असा उल्लेख केला आहे. जहाज लंडनला परतल्यावर जाॅर्जने तिला लग्नाची मागणी केली पण क्रिस्टीनीने ती अमान्य केली. 15 जून 1952 रोजी क्रिस्टीनी वास्तव्यास असलेल्या एका हाॅटेलात चिडलेल्या जाॅर्जने क्रिस्टीनीला भोसकले. दुसऱ्या महायुद्धात अलौकिक शौर्याने शत्रूला भयभयीत करून सोडणारी  गाजवणारी महिला गुप्तहेर आपल्याच मित्राच्या कृतीची बळी ठरली. पुढे जाॅर्जने आपला गुन्हा मान्य केला व त्याला शिक्षा झाली. महायुद्धाचे मार्मिक वर्णन क्रिस्टीनी ‘शांततेसाठीचे क्रौर्य’ अशी करायची. क्रिस्टीनीची हत्या मानसिक अशांततेचे क्रौर्य म्हणून वर्णन करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या