चिरतरुण जोडी

296

झी टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका एका नवरा बायकोच्या नात्यावर आधारित आहे आणि हे काही लहान वयातले टिपिकल नवरा बायको नाहीत तर या मालिकेचा हीरो आहे ८३ वर्षांचा आणि बायको आहे सत्तरीमधली. बायकोच्या या भूमिकेत आहेत रसिकांची आवडती अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने. ‘जुळून येती रेशीमगाठी’मधल्या त्यांच्या माईला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला. आपली सासू अगदी माईसारखी पाहिजे, असेही नवीन लग्न ठरलेल्या सगळ्या तरुणींना वाटत होते. या मालिकेचे शूटिंग सुरू असल्याने ही मंडळी सापडणेसुद्धा कठीण होते, पण रात्री शूटिंग संपल्यावर सुकन्या यांनी गप्पा मारायला वेळ काढला.

नव्या मालिकेतील भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ही भूमिका खूप वेगळी आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येते आहे. कारण मधुगंधानी (मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी) ही वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे. मला स्वतःला भूमिकेतील आव्हाने स्वीकारायला आवडतात. मग त्यात वयाचा किंवा मेकअपचा प्रश्न येत नाही. आता ही मालतीची भूमिका माझ्या वयापेक्षा दीडपट वयाची आहे आणि या भूमिकेमधले दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी पहिल्यांदाच दिलीपभाई (दिलीप प्रभावळकर) सोबत काम करते आहे. ते फार कमी बोलतात पण ते खूप मिश्कीलदेखील आहेत. मधूनच एखादी गुगली टाकतात आणि ही मालिकादेखील त्यांनीच लिहिलेल्या नाटकावर आधारित आहे.

नयनाताईकडे आठवणींचा ठेवा आहे, त्यामुळे आमच्या गप्पा खूप रंगतात. त्यांनी वेगेवगळ्या काळात थिएटर आणि अभिनय केला आहे. त्या वेळचा काळ आणि बदलत गेलेली रंगभूमी याबद्दल त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. त्यांच्याकडे आठवणींचा इतका ठेवा आहे की ते ऐकताना नकळत काहीतरी शिकता येते. या मालिकेची निर्माती आहे अभिनेत्री मनवा नाईक. ‘आभाळमाया’ या सीरियलमध्ये तिने सुकन्याताईंच्या मुलीचे काम केले होते. ती आज निर्माती म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येते आहे. याचे सुकन्यांना खूप कौतुक आहे आणि या कौतुकात माझे मुलगी प्रोडय़ुसर झाली आहे याचा निखळ आपलेपणादेखील आहे.

आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱया सुकन्याताईंचे सुख अगदी लहान गोष्टीत आहे. त्यांच्या या सीरियलचा सेट त्यांच्या घरापासून केवळ पंधरा मिनिटांवर आहे. त्यामुळे त्यांना सेटवर जाणे आणि त्यातही काम संपल्यावर पटकन घरी येता येणे हे सगळ्यात सुखकारक वाटते. ‘चूकभूक द्यावी घ्यावी’ ही मालिका नात्यावर आधारित आहे हे नक्की त्यात खुसखुशीत मनाची म्हातारी जोडी प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येते आहे.

नात्यातील नोकझोक

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मधली ही जोडी आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील जोडीदाराशी असलेले नाते यात काही जवळीक आहे का? यावर त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या तसा पाहिला गेले तर खूप साम्य आहे आणि नाहीदेखील. संजय प्रत्येक गोष्टीकडे विनोदी अंगाने बघतो तर मी तशी खूप सीरियस आहे. तशीही मी त्याला घाबरून असते आणि प्रत्येक नात्यात नोकझोक चालूच असते ना? आमचं याहून काही वेगळे नाही, पण संजयला काम घरी आणलेले आवडत नाही त्यामुळे या भूमिकेचा मला घरी उपयोग होणार नाहे. पण जशी प्रत्येक भूमिका मला काहीतरी शिकवते तसे ही मालती पण मला काही शिकवेल हे नक्की. माईकडून मी क्षमाशीलता आणि सगळ्यांना आपलेसे कसे करून घ्यायचे हे शिकले तसेच या मालतीकडून मला राग आला तरी तो गोड असावा आणि सगळ्यांना समजून घेतेल पाहिजे हे शिकायला मिळेल. कारण या मालिकेत मला ८३ वर्षांचा नवरा आहे तशीच १०१ वर्षांची सासूदेखील आहे.

मालती माईपेक्षा वेगळी

या मालिकेतील राजाभाऊ आणि मालती यांच्या नात्याबद्दल सांगताना सुकन्या म्हणाल्या की, ही मालती मागच्या माईपेक्षा खूप वेगळी आहे. ती कासव आहे, मंद आहे पण तरीही तिची काही मते आहेत. ती प्रेमळ असली तरीही तिच्यात उपहासात्मकता आहे पण ती मुळीच बोचरी नाही. आता हे बघायचे आहे की या नात्यातला ससा जिंकतो की कासव जिंकते. या दोन्ही म्हातारा-म्हातारी लोकांना नक्कीच आपली वाटणार. कारण ते आपल्या आजूबाजूला दिसणाऱया जोडप्यासारखे आहेत. या दोघांच्या नात्यात खुसखुशीतपणा आहे. पण उगाचच भावनेच्या भरात गेलेली किंवा ओढून आणलेली कॉमेडी नाही. या दोघांमधले नाते खूप नैसर्गिक आहे की लोकाना ती पात्रं आपली वाटतील. अनेक वर्षे संसार केल्यावर त्यांच्या प्रेम, सहवास समजूतदारपणा आहे, पण तरीही त्यांच्यातल्या नात्यात ते फ्रेशनेस आहे. थोडय़ा हटके कथा, गोष्टी रसिकांना नेहमीच आवडतात. सुकन्या कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर लवकरच अशा वेगळ्या भूमिकेतून आपल्याला भेटणार आहेत..

टीमचे कौतुक

अतिशय स्पर्धा असलेल्या या सृष्टीत एकमेकांचे कौतुक खूप कमी करताना आढळून येतात पण सुकन्यांना आपल्या टीमचे खूप कौतुक आहे. ‘जुळून येती…’ मधली त्यांची मोठी सून विजया म्हणजेच मधुगंधा कुलकर्णी. जिने या मालिकेचे संवाद लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ‘होणार सून मी या घरची’ ही सीरियलदेखील त्यांच्याच लेखणीमधून उतरलेली. तिच्याबद्दल बोलताना सुकन्याताई म्हणाल्या की, कोणत्याही सीरियलमध्ये लेखन खूप महत्त्वाचे आहे. कारण आम्ही ऍक्टर जेव्हा बोलत असतो तेव्हा ती वाक्य खरी आणि सोपी वाटणे महत्त्वाचे असते आणि मधुगंधानी ते तसेच लिहिलेले आहे. वाक्य त्यामुळे पटकन लक्षात राहतात पण ही भूमिका हे असेच बोलणार इतक सहजतेने तिने लिहिलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या