चुंबक : चांगल्या आणि वाईटातल्या चुंबकीय आकर्षणाची हळूवार गोष्ट

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे<<

प्रत्येक  मूल जन्मतं ते निरागसतेचं वरदान घेऊनच, पण कालांतराने जगात वावरताना स्वप्नांचा जन्म होतो आणि मग त्याच्या निरागसतेवर चांगूलपणा आणि वाईटपणाची पुटं चढायला लागतात. अर्थात त्याचा मूळ स्वभाव कसा आहे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तो कुठच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झालाय, त्याला आयुष्यात काय अनुभव आलेयत यानुसार त्याच्या स्वभावातली एक छटा अधिक गडद होते, तर उरलेली छटा फिकी होत जाते. निरागसता, जगरहाटी आणि त्यात बदलणाऱया या छटा अगदी बारकाईने दाखवणारा ‘चुंबक’ हा सिनेमा.

ही गोष्ट मुंबईत एका हॉटेलात पोऱयाचं काम करणाऱया एका पोरसवदा मुलाची आहे. त्याच्या डोळय़ांत एक स्वप्न असतं. आपल्या गावी साताऱयाला जाऊन स्टेशनच्या जवळ नव्या दुकानांच्या गाळ्यात, मोक्याच्या जागी रसवंतीगृह सुरू करायचं. त्यासाठी मेहनतीने आपल्याला जमेल तसा पैसा तो गोळा करत असतो, पण अचानक त्याची फसवणूक होते आणि त्याचा सगळा पैसा लुबाडला जातो. मग दोनाचे चार करण्यात पटाईत असणारा त्याचा मित्र त्याला वाममार्गाने पैसा कमवायची कल्पना देतो. एका बाजूने पापभिरू मन त्याला मागे ओढत असतं तर दुसऱया बाजूने स्वप्न ते पाप करायला खुणावत असतं. शेवटी स्वप्न स्वभावावर मात करतं आणि कोणाला तरी लुबाडून आपला स्वार्थ शोधण्याच्या त्याच्या जाळ्यात एक माणूस अडकतो, पण तो माणूस विशेष असतो. जरी वयाने मोठा असला तरीही त्याचं मनाचं वय अगदी लहानच राहिलेलं असतं आणि म्हणूनच त्याची निरागसता अबाधित असते. जगातल्या चांगूलपणावरचा विश्वासही ठाम असतो. मग सुरू होतो एक एकत्र अनोखा प्रवास. वयाने लहान असणाऱया, पण जगाचे चटके लागल्याने व्यवहारी झालेल्या मुलाची आणि वयाने मोठा असूनही मनाने निरागसच राहिलेल्या माणसाची…. आणि याच सरमिसळीतून कधी तिखट, कधी कडू, कधी आंबट तर कधी गोड असे अनुभव येतात. शरीराने लहान असणाऱया आणि मनाने लहान असणाऱया अशा दोन समवयस्क मुलांचं हे अनोखं भावविश्व प्रेक्षकाला नक्कीच लुब्ध करतं. मग स्वप्नांचा विजय होतो की निरागस मनाचा, काय होतं त्या दोघांचं, नक्की तो मुलगा काय करणार असतो आणि त्याची कल्पना यशस्वी होते का… हा आंबटगोड प्रवास अनुभवण्यासाठी ‘चुंबक’ हा सिनेमा पाहायला हवा.

या सिनेमाचं शक्तिस्थळ म्हणजे कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि अतिशय संवेदनशील कथेवर बांधली गेलेली अप्रतिम पटकथा आणि त्यावर चढलेला संवादांचा उत्तम साज. अर्थात या सगळ्या साजाला नेमकेपणानं मांडणारं दिग्दर्शन, या कथेच्या जातकुळीला नेमकं टिपणारं छायांकन, अतिशय नेटकेपणानं केलेलं संकलन या सगळ्या गोष्टी तितक्याच जमून आल्या आहेत आणि म्हणूनच पक्क्या बसलेल्या चुंबकाइतकाच हा सिनेमा प्रेक्षकाचं मन आकर्षित करील यात शंकाच नाही.

चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा जेव्हा गावातून मुंबईत येतो आणि दिवसरात्र मेहनत करून पै-पैसा जमवतो तेव्हाच त्याचं बालपण संपलेलं असतं. जगरहाटीत तो कधीचाच सामील झालेला असतो, पण तरीही कधीतरी त्याच्या वयाप्रमाणे त्याच्या बालछटा पुन्हा जिवंत होऊ पाहतात. त्याच्यातलं लहान मूलही त्याला खुणावत असतं, तर कधी परिस्थितीप्रमाणे वयापेक्षा कितीतरी पोक्त व्हायची क्षमताही त्याच्यात आली असते. साहील जाधव या बालकलाकाराने साकारलेला हा मुंबईत अनेक ठिकाणी दिसणारा बाळू अगदी तंतोतंत. कुठल्या तरी हॉटेलात गेल्यावर दिसणारा, टेबल साफ करणारा चटपटीत पोऱया अगदी हमखास डोळय़ांसमोर येतो. मूळ स्वभाव, त्यावर बसलेली आजूबाजूच्या वातावरणाची पुटं, स्वतŠच्या कुवतीप्रमाणे सगळ्यात मोठं वाटणारं त्याचं स्वप्न, चांगूलपणा आणि वाईटपणा या दोन्हीच्या बारीक रेषेवर दोलायमान होणारं त्याचं सरळ, स्वच्छ मन हे सगळं त्यानं अगदी उत्तम उभं केलंय. त्याच्या वावरातली सहजताच जास्त भावून जाते आणि या सिनेमात सगळ्यात जास्त भाव खाल्लाय तो स्वानंद किरकिरेने. वय पन्नास असूनही पंधरा वर्षांच्या मुलाप्रमाणे असणारं त्याचं निरागस भावविश्व खरोखरच सुंदर उभं राहिलंय. सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यानं साकारलेल्या व्यक्तिरेखेत कमालीची स्थिरता राखलीय. त्याच्या वागण्याचं कधी हसू येतं, तर कधी त्याच वागण्यामुळे डोळय़ांत पाणीदेखील येतं आणि मग एका क्षणी जेव्हा तो पन्नास वर्षांचा माणूस पंधरा वर्षांच्या मुलाप्रमाणे हट्टी वागायला लागतो आणि त्याला सांभाळायला पंधरा वर्षांचा मुलगा पन्नास वर्षांचा प्रौढ होऊन त्याची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा पडद्यावर साकारणारं ते साधंसरळ नाटय़ पाहताना आपण कधी समरस होतो ते कळतच नाही. खरं तर यात छोटय़ा छोटय़ा भूमिकांमध्ये इतरही कलाकार आहेत. त्या सगळय़ांची कामं चांगलीच झाली आहेत, पण शेवटी मात्र लक्षात राहतात हे दोघंच.

जेवणाची वेळ झाली की त्याचं अस्वस्थ होणं, मनात खोल कुठेतरी आपल्या माणसांबद्दल असलेलं खरंखुरं पेम, चोरी करताना केवळ एक वर्षाची मुलगी बघतेय म्हणून येणारी अपराधीपणाची भावना, स्वतŠच्या वस्तूंची असलेली जाणीव, प्रत्येक गोष्टीकडे सरळच बघणारं मन हे सगळंच खूप अलवारपणे उभं राहिलंय, तर त्याच वेळी त्या लहान मुलाच्या मनात खदखदणारी भावना, स्वप्नांमागे धावताना निरागसतेचा पडणारा बळी हेदेखील तितकंच खंबीरपणे अधोरेखित झालंय आणि ते बघताना जाणवतं की, ही कथा फक्त त्या सिनेमातल्या दोन पात्रांची नाही, तर या शहराच्या गर्दीत हरवलेल्या प्रत्येकाची आहे. स्वप्नांची कास पकडताना मनातल्या हळुवार भावना, आयुष्याकडून असलेल्या साध्या अपेक्षा, निरागसता, चांगूलपणावरचा विश्वास या सगळ्या गोष्टी फिक्या पडत जातात आणि मनात उरतो तो फक्त जिंकण्याच्या ईर्षेने कसेही हातपाय मारायला तयार झालेला स्पर्धक.

एका निरागस गोष्टीच्या माध्यमातून ‘चुंबक’ हा सिनेमा अलगद उलगडतो आणि त्या भावविश्वात आपणही एकरूप होऊन जातो. हळुवार भावना, मनाचं वाईटाकडे आणि चांगल्याकडेही होत जाणारं परिवर्तन, मैत्रीत जिवंत असायला हवा असा विश्वास या सगळ्या गोष्टी हा सिनेमा पाहताना प्रकर्षाने जाणवतात आणि सिनेमा संपल्यावर एक चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान मनात उरतं.

> दर्जा     : ****

> सिनेमा : चुंबक

> निर्माता   : अरुण भाटिया, केप ऑफ गुड  फिल्म्स आणि कायरा कुमार   क्रिएशन्स

> प्रस्तुतकर्ता     : अक्षय कुमार

> दिग्दर्शक   : संदीप मोदी

> लेखन     : सौरभ भावे आणि संदीप मोदी

> छायांकन : रंगराजन रामचंद्रन

> संगीत    : साकेत कानेटकर

> कलाकार : स्वानंद किरकिरे, साहिल जाधव, संग्राम देसाई