विडी, सिगारेट विक्रीसाठी नवीन परवान्याची सक्ती नको!

93

सामना ऑनलाईन । मुंबई

विडी, सिगारेट आणि पानपट्टीवरील वस्तू विक्रीसाठी नवीन परवाना बंधनकारक करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारचा आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने स्वीकारू नये. कोटपा कायद्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱयांवर अनेक जाचक अटी आणि नियम लादले आहेत ते रद्द करावेत अशा विविध मागण्यांसाठी मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाच्या वतीने सोमवारी आझाद मैदानात विशाल धरणे आणि निदर्शन आंदोलन छेडण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून विडी, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री व्यवसायात आपण असून आपली रोजीरोटी याच व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु तंखाबू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास घातक आहेत अशी सबब पुढे करून सामाजिक संस्था आणि आरोग्य संस्थांच्या दडपणाला बळी पडून केंद्र आणि राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंधने घातली आहेत. त्यानुसार नवीन कायदेही आणू पाहत आहेत. अशाप्रकारे कायदा आणल्यावर सिगारेट आणि पानपट्टीचा व्यवसायच नष्ट होईल आणि आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. आमची मुलेबाळे रस्त्यावर येतील. सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राज्यभरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे आझाद मैदानात एकत्र आले होते. सकाळी १०  वाजल्यापासूनच त्यांच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले.

घोषणांचा निनाद
शासनाच्या तंबाखूविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी, आपली रोजीरोटी वाचविण्यासाठी, अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी, आपला व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी, लायसनराज आणि भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी ‘चला आझाद मैदान’ अशा घोषणांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आझाद मैदानातील परिसर दणाणून सोडला.

तंबाखू विक्रेत्यांच्या मागण्या
– कोटपा कायद्यातील जाचक अटी आणि नियम रद्द करा.
– बिडी आणि सिगारेट तसेच पानपट्टी वस्तू विक्रीसाठी नवीन परवाने बंधनकारक असा केंद्र सरकारकडून आलेला प्रस्ताव स्वीकारू नये.
– पान, विडी, सिगारेट, पानपट्टीच्या दुकानात अन्य खाद्यपदार्थ विक्रीला ठेवण्याबाबत बंदी घालण्याच्या केंद्र सरकारकडून येणाऱया बंदीचा प्रस्ताव स्वीकारू नये.

आपली प्रतिक्रिया द्या