नोटबंदी, जीएसटीचा मार यामुळे कर्जात बुडालेल्या चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

39

सामना प्रतिनिधी । भाईंदर

भोजपुरी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक शमशाद शेख यांनी गुरुवारी मीरा रोड येथे आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या वर्षी लागू झालेली नोटबंदी आणि त्यानंतर बसलेला जीएसटीचा मार यामुळे हा निर्माता कर्जात बुडाला होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कर्जबाजारी झालेला शमशाद प्रचंड आर्थिक चणचणीत होता.

शमशाद अहमद जवाद शेख उर्फ शादजी (५०) असे यांचे नाव आहे. ते मीरा रोड, लोढा कॉम्प्लेक्स येथील न्यू सलोनी हाईटस इमारतीत आपल्या पत्नीसह रहात होते. त्यांनी भोजपुरी पाच चित्रपटांचे दिग्दर्शन आणि दोन चित्रपट निर्माण केले होते. त्यांचा “स्वर्ग” हा भोजपुरी चित्रपट काही दिवसातच रिलीज होणार होता. त्याशिवाय त्यांनी अलिकडेच भोजपुरी गायक-नायक अरविंद अकेला उर्फ कल्लुजी यांना घेऊन “तुम्हारे प्यार की कसम” या चित्रपटाची निर्मिति सुरू केली होती. हा चित्रपट सुध्दा अंतिम टप्प्यात होता. नोटबंदी आणि जीएसटीचा फटका या चित्रपटांना बसला होता. नोटबंदी आणि जीएसटीचे कारण सांगत अनेक फायनान्सरांनी आपला हात आखडता घेतला होता. कर्जामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. अलिकडेच त्यांच्या मित्रांनी चित्रपटाचे काम रखडू नये म्हणून त्यांच्यासाठी दहा लाख रुपयांची व्यवस्था सुध्दा केली होती. मात्र गुरुवारी दुपारी बारा-साड़ेबाराच्या सुमारास पत्नी शेजारच्या घरात गेली असता, घरातील पंख्याच्या हुकाला गळफास लाऊन त्यांनी आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या