प्रेमासाठी ‘चरस’ लपवले, CISF चा वरिष्ठ अधिकारी अटकेत

1168

परराष्ट्र मंत्रालयाच्या सुरक्षा विभागामध्ये संचालक पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सनदी अधिकाऱ्याच्या नवऱ्याला अडकवण्यासाठी रचण्यात आलेल्या षडयंत्राचा भंडाफोड झाल्याने ही अटक करण्यात आली आहे. रंजन प्रताप सिंह असं या CISF अधिकाऱ्याचे नाव आहे.

रंजन प्रताप सिंह हा 2000 साली उत्तराखंडमधल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रबोधिनीमध्ये सनदी अधिकाऱ्यांसाठी 4 महिन्यांचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथे त्याची भेट हेच शिक्षण घ्यायला आलेल्या एका महिलेशी झाली होती. ही महिला आता राजस्थानमध्ये सनदी अधिकारी म्हणून काम करत आहे. उत्तराखंडमधल्या पहिल्या भेटीपासून रंजन प्रताप सिंहला ही महिला आवडायला लागली होती. तो तिच्या मागेच लागला होता. या महिलेने त्याला कडक शब्दात ताकीद दिली होती तरीही तो सुधारला नाही. दरम्यानच्या काळात या महिलेचे लग्न झाले. महिलेचा नवरा हा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये सल्लागार म्हणून काम पाहतो. लग्नानंतरही रंजनने या महिलेला फोन करणं सुरू ठेवलं होतं. यामुळे या महिलेने त्याला पुन्हा कडक शब्दात सणकावलं होतं.

महिला आपल्याला दाद देत नाही याचा राग आल्याने रंजन प्रताप सिंहने तिला धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्याने त्याच्या बालपणीच्या मित्राला हाताशी धरून चरस विकत घेतलं होतं. रंजनने महिलेच्या नवऱ्याला अडकवण्यासाठी हे चरस त्याच्या गाडीमध्ये लपवण्याचं ठरवलं होतं. सिंहने नीरज चौहान या पेशाने वकील असलेल्या त्याच्या मित्राच्या मदतीने चरस नवऱ्याच्या गाडीत लपवलं. नवऱ्याला अडकवण्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका फळविक्रेत्याचा फोन घेतला आणि थेट पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला निनावी फोन करत एका गाडीत चरस असल्याची माहिती दिली. रंजनने महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला गाडीचा तपशीलही दिला होता.

नियंत्रण कक्षात फोन करण्याऐवजी थेट महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला फोन केल्याने या तक्रारीबाबत पोलिसांना संशय आला होता. त्यांनी ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरवर फोन करून चौकशी केली. ज्या फळविक्रेत्याचा फोन होता त्याने दोन माणसांनी आपल्याकडून फोन घेऊन फोन केल्याची माहिती दिली. त्याने फोन करणाऱ्यांचे वर्णन आणि त्यांच्या गाडीचा तपशीलही दिला. गाडीमध्ये तीन ठिकाणी चरस लपवून ठेवलं होतं, साधारणपणे अंमली पदार्थांचे तस्कर असे अशा तऱ्हेने गोष्टी विखरून ठेवत नाही. पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही दृश्ये तपासली तेव्हा त्यांना त्यामध्ये रंजन आणि चौहान हे एसएक्स फोर गाडीतून उतरल्याचे दिसून आले होते. हा तपशील मिळाल्यानंतर पोलिसांनी गाडी आणि रंजन यांना शोधून काढले. रंजन आणि चौहान या दोघांना फळवाल्यानेही ओळखले ज्यामुळे दोघांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या