ओशो आश्रमाचे 107 कोटींचे दोन भूखंड विक्रीला, साधकांचा विरोध

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जागतिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या ओशो आश्रम म्हणजेच ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’मधील दोन भूखंड विकण्याच्या तयारीत आहेत. ओशो आश्रमाची मालकी असलेल्या झुरीचमधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडून या भूखंडाची विक्री किंमत 107 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या विक्रीला ओशो यांच्या साधकांच्या ‘ओशो फ्रेंड्स फाऊंडेशन’ या संघटनेने विरोध केला असून, मुंबईत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोरेगाव पार्क या शहरामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महागडय़ा असणाऱ्या भागामध्ये ओशो आश्रमातील दीड एकर जागेचे दोन भूखंड विक्रीसाठी काढले जात आहेत. यामध्ये स्विमिंग टँक आणि टेनिस कोर्ट याचा समावेश आहे. हे दोन्ही भूखंड बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांना विकण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे. बजाज यांचा बंगला ओशो आश्रमाला लागून आहे. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन ही एक धर्मादाय संस्था आहे. मुंबईतील धर्मादाय आयुक्तांकडे हे भूखंड विकण्याबाबत फाऊंडेशनतर्फे अर्ज करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या