गिरनार रोपवेचे दर आणखी कमी करण्याची मागणी

भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक जगाच्या कानाकोपऱ्यातून गुजरातमधील गिरनार येथे येत असतात. दर्शनासाठी भाविकांना 10 हजार पायऱ्या चढून जाव्या लागतात. दत्तात्रेयांच्या पादुकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास परीक्षा बघणारा असतो. भाविकांची सोय व्हावी खासकरून वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांना सहजतेने शिखरावर पोहोचता यावे यासाठी रोपवे बांधण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रोपवेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या दोन दिवसानंतर त्याच्या तिकीटाचे दर कमी करण्यात आले होते. हे दर आणखी कमी करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

रोपवेमुळे 7.43 मिनिटांत गाठता येतं शिखर
पायी शिखरावर जाण्यासाठी बराच वेळ लागतो, मात्र रोपवेमुळे 7.43 मिनिटांमध्ये शिखरावर पोहोचता येतं. या रोपवेसाठी जीएसटी धरून 826 रुपये वयस्क व्यक्तींसाठी तिकीटाचा दर होता. लहान मुलांसाठी हा दर जीएसटी धरून 413 रुपये इतका होता. तिकीट दरांबाबत नाराजीचा सूर उमटायला लागल्याने आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर हे दर कमी करण्यात आले. वयस्क व्यक्तींसाठी हा दर 700 रुपये तर लहान मुलांसाठी 350 रुपये करण्यात आला.

तिकीट दर कमी करण्याची भाजप आमदाराची मागणी
जुनागड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिकाभाई जोशी यांनी तिकीटाचे दर आणखी कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. त्यांनी यासाठी तिथल्या मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे. वयस्क व्यक्तींसाठीच्या तिकीटाचे दर 300 रुपये करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटलंय की पावागड इथल्या रोपवेसाठी जाऊन परत येण्यासाठीचे तिकीट 150 रुपये इतके आहे. गिरनारचा रोपवे हा पावागडपेक्षा आकाराने तीन पट मोठा आहे, मात्र तिकीटाचे दर हे पावागड पेक्षा 6 पट जास्त आहे असं जोशी यांचं म्हणणं आहे.

रोपवे उद्घाटनाच्या दिवशी मोफत प्रवास
अहमदाबाद मिररने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की गॅरेजचा मालक असलेल्या मिलन केलैया याचं संपूर्ण कुटुंब गिरनार इथे दर्शनासाठी आलं होतं. त्याचे आईवडील बायको आणि दोन मुलं असे इथे आले होते. या सगळ्यांच्या तिकीटाचा दर हा 5 हजार रुपये होत असल्याने रोपवेने जाण्याऐवजी ते पायी चढत गेले. ही रोपवे सेवा उषा ब्रेको कंपनी सांभाळते आहे. त्याचे मालक मनोज पवार यांनी सांगितलं की जीएसटीची रक्कम त्यांनी आधीच कमी केली आहे ज्यामुळे दरांमध्ये कपात झाली आहे. पहिल्या दिवशी ही सेवा मोफत होती आणि त्यानंतरच्या तीन दिवसांत 5 हजार भाविक रोपवेने दर्शनासाठी गेले होते.

महापौर आणि खासदाराचीही दर कमी करण्याची मागणी
आमदार भिकाभाई जोशी यांच्याप्रमाणे जुनागडचे महापौर धीरूभाई गोहेल यांनीही आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे सांगितले आहे. लोकांची मागणी हे दर आणखी कमी करण्याची असून ते 400 रुपये करावेत असं त्यांचं म्हणणं आहे. जुनागडचे खासदार एमपी राजेश चुडासमा यांनीही राज्य सरकारला रोपवेच्या तिकीटाचे दर कमी करावेत अशी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या