दादरच्या भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीतील धुरामुळे आजूबाजूला राहणारे रहिवासी सध्या मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने, विद्युतदाहिनी आणि पीएनजीवरील दाहिनीने अंत्यसंस्कार केले जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून पीएनजीदाहिनी बंद आहे. त्यामुळे पार्थिवांवर विद्युतदाहिनी आणि लाकडावरील पारंपरिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होणाऱया धुराचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत आहे. दरम्यान, पीएनजीदाहिनीची लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
दादरच्या भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये दादर आणि आजूबाजूच्या परिसरातील मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानभूमीच्या आजूबाजूला रहिवासी इमारती असल्यामुळे स्मशानभूमीतील धुराचा त्रास या रहिवाशांना होत होता. मात्र त्यानंतर आलेल्या विद्युतदाहिनी आणि पीएनजीदाहिनींवर अंत्यसंस्कार सुरू झाल्यामुळे धुराचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीएनजीदाहिनीतील फायर ब्रिक्सची (भट्टीतील विटा) दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे जळाऊ लाकडांवरील अंत्यसंस्कार आणि विद्युतदाहिनींवरील ताण वाढला आहे. त्यामुळे इतर अंत्यसंस्काराला उशीर होतो. त्या धुराचा फटका रहिवाशांना बसत आहे.
असे होतात अंत्यसंस्कार
स्मशानभूमीत तीन पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. जळाऊ लाकडांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात, मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होत होता. हा धूर आजूबाजूला पसरू नये यासाठी महापालिकेने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सक्शन पंप बसवले. त्यानंतर आता आधुनिक अशा पर्यावरणपूरक विद्युत दाहिनी आणि पीएनजी दाहिन्या बसवण्यात आल्या. त्यामुळे धुरापासून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
रहिवाशांना होणाऱ्या समस्या
वारंवार होणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे रहिवासी बेजार झाले आहेत. वृद्ध आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. समुद्राकडून मोठ्या प्रमाणात वारा वाहू लागल्यानंतर धूर, राख आणि पार्थिवाच्या वासाचे प्रमाणही वाढते. बाजूलाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बांधले जात आहे. या धुराचा स्मारकावरही परिणाम होत असल्याचे शिवाजी पार्कमधील रहिवासी परिमल सबनीस यांचे म्हणणे आहे.
दुरुस्तीचे काम सुरू
गेल्या दोन दिवसांपासून स्मशानभूमीतील पीएनजीदाहिनी बंद आहे. त्यामुळे अन्य दोन दाहिन्यांवर अंत्यसंस्कारांचा ताण वाढला आहे. पालिकेच्या इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल विभागाकडून दाहिनीतील फायर ब्रिक्स बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र लवकरच ही दाहिनी दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे रहिवाशांना धुराचा त्रास होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब कवळे यांनी दिली.