भर उन्हात नागरिकांना थांबवले! देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळेस धक्कादायक प्रकार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहरात आज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक असताना या ठिकाणी पोलिसांनी अतिशय कडक बंदोबस्त करून येथे येणाऱ्यांना मज्जाव केला. तसेच भर उन्हामध्ये नागरिकांना थांबवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून यामुळे अनेकांना तात्कळत बसावे लागले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज दुपारी तीन पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नागरिकांचे आवश्यक काम करण्यासाठी नागरिकांना कार्यालयाच्या बाहेर ऐन उन्हाळ्यात ताटकळत थांबावे लागले.

ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सभा होती त्या ठिकाणी सुद्धा अनेकांना अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणचा ताबा घेऊन अनेकांना बाजूला काढले. त्यामुळे अनेकांना उन्हातच बाहेर थांबावे लागले व या ठिकाणी सुरू असलेली सभा कार्यकर्त्यांना ऐकावी लागली. तर काही ठिकाणी पोलिसांनी थेट अरेरावीची भाषा करत काहींना बाजूला सारले. त्यामुळे काही अधिकाऱ्यांमध्ये व त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुद्धा झाली. वास्तविक पाहता या सगळ्या प्रकारावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण दुसरीकडे नगर शहरामध्ये आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना असा त्रास होणार असेल तर इतरांचे काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.