‘दशक्रिया’ला पुण्याच्या ‘सिटी प्राईड’मध्ये ‘नो एन्ट्री’

सामना ऑनलाईन । पुणे

दशक्रिया चित्रपटाला पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिटी प्राईड कोथरुड मल्टिप्लेक्सने स्वतःच्या थिएटरमध्ये दशक्रिया चित्रपट प्रदर्शित करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. भूमिका जाहीर केल्यानंतर ‘सिटी प्राईड’च्या व्यवस्थापनाने सिटी प्राईड कोथरुडवरील ‘दशक्रिया’चे ऑनलाइन बुकिंग बंद केले आहे.

दशक्रिया चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापनांशी संपर्क साधला आहे. चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती ब्राह्मण महासंघाने थिएटर आणि मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापनांना केली आहे. ब्राह्मण महासंघाने चित्रपटाला आक्षेप घेत यामधून ब्राह्मणांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याची भूमिका ब्राह्मण महासंघाने जाहीर केली आहे.

दशक्रिया या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा ६४वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. उद्या (१७ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘दशक्रिया’साठी चित्रपटगृहाचे मालक तयार नाहीत हे चुकीचे!

दशक्रिया चित्रपटाला विरोध करणाऱ्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे हे दशक्रिया चित्रपट प्रदर्शित करण्यास चित्रपटगृहांचे मालक तयार नसल्याचा चुकीचा संदेश सर्वत्र पसरवीत आहेत असे स्पष्टीकरण चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी दिले आहे. आमचे वितरक रजत एंटरप्रायझेस आणि रंगनील क्रिएशन्स निर्मितीसंस्थेला असे कोणत्याही चित्रपटगृह मालकाने कळविले नसून दवे प्रसार माध्यमांची, तसेच इतर चित्रपटगृहचालकांची दिशाभूल करून संभ्रम तयार करीत चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करीत आहेत असा अरोपही त्यांनी केला आहे.

आम्ही दशक्रिया चित्रपट ठरल्याप्रमाणे उद्या (१७ नोव्हेंबर २०१७) महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहोत असे निर्मात्या कल्पना विलास कोठारी, पटकथा, संवाद गीत प्रस्तुतीकार संजय कृष्णाजी पाटील, दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील आणि कार्यकारी निर्माता राम कोंडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या