कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून सव्वा लाख लांबविले, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एका महिलेच्या खात्याची माहिती घेत तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विश्रांतवाडीतील 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना ऑनलाईन पद्धतीने घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,  फिर्यादी महिला यांचे पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. रविवारी (दि.4)  महिलेला अनोळखी नंबरवरून फोन आला. माझे नाव राहुल शर्मा असल्याचे सांगून तुमच्या एटीएममधून वजा झालेले 20 हजार परत करतो, असे महिलेला सांगण्यात आले. महिलेचा विश्वास संपादीत केल्यानंतर त्यांचा खात्याची माहिती घेत मोबाईलवर आलेला ओटीपी सांगण्यास भाग पाडले. महिलेने ओटीपी सांगितल्यानंतर खात्यामधून 91 हजार 600 व दुसर्‍या खात्यातून 28 हजार 890 रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेले पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.