मुंबईचे आज बंगळुरूला ‘चॅलेंज’

20

सामना ऑनलाईन,मुंबई

उद्घाटनाच्या लढतीत पुणे संघाकडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या तगड्या संघांना पराभूत करून ‘आयपीएल’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत झोकात पुनरागमन केले. आता उद्या, शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपुढे मुंबईचे आव्हान असेल. मात्र कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याच लढतीत पुनरागमन करणार असल्याने बंगळुरूच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विराट सेना आणि रोहित ब्रिगेड यांच्यातील तुल्यबळ लढतीची उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.

गतवेळचा उपविजेता बंगळुरू सध्या ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लढतींत या संघाला केवळ दिल्लीवर विजय मिळवता आला. सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांकडून बंगळुरूला हार पत्करावी लागली. ख्रिस गेलचा हरवलेला फॉर्म ही बंगळुरूची प्रमुख डोकेदुखी ठरली आहे. एबी डिव्हिलीयर्सने पंजाबविरुद्ध ४६ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली होती, मात्र दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने बंगळुरूला या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. केदार जाधवने दिल्लीविरुद्ध ३७ चेंडूत ६९ धावा फटकावून बंगळुरूला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे दुखापतीतून सावरलेल्या कोहलीच्या आगमनामुळे बंगळुरूच्या संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिली स्टानलेक आणि युजवेंद्र चहल यांच्यावर पंजाबच्या गोलंदाजीची मदार असेल.

दुसरीकडे लसिथ मलिंगाच्या पुनरागमनानंतर मुंबईने कोलकाता आणि हैदराबाद या दोन बलाढय़ संघांना हरविले. हा संघ ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. मलिंगासह हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा व मिचेल मॅकलनघन अशी विविधतेने नटलेली गोलंदाजी मुंबईच्या दिमती आहे. पार्थिव पटेल व जोश बटलर यांची आश्वासक सलामी आणि नितीश राणा, हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा असे नव्या दमाचे फलंदाज ही मुंबईची ताकद आहे. वेस्ट इंडीजचा कायरॉन पोलार्ड अद्याप आपल्या लौकिकास साजेसा खेळत नाहीये हीच मुंबईची मुख्य समस्या आहे. त्यामुळे उद्या कदाचित पोलार्डला खाली बसविले जाईल. लागोपाठच्या विजयामुळे मनोबल उंचावलेला मुंबई आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे उत्साह दुणावलेला बंगळुरू यांच्यात उद्या चुरशीची लढत अपेक्षित आहे.

बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि गुजरात लायन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा उद्या ‘आयपीएल’ टी-२० क्रिकेटच्या ‘रन’धुमाळीत पुनरागमन करतील. दोन्ही खेळाडू मॅचविनर असल्याने त्यांच्या आगमनाने नक्कीच ‘आयपीएल’मध्ये रंगत निर्माण होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱया लढतीत क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. बंगळुरू संघाच्या सरावतही कोहली सहभागी झाला होता. जाडेजालाही ‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर दोन आठवडय़ांची विश्रांती घेण्यास सांगितले होते. आता दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनामुळे उभय संघांची ताकद वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या