ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या ?

तमिळनाडूतील तंजावूर येथे 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर टाकण्यात आलेल्या दबावाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या विद्यार्थिनीने म्हटलं आहे. तिचा तसं सांगत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी आता नव्या पैलूचा विचार करत त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली होती. 9 जानेवारीला या मुलीने विषारी द्रव्य प्यायले होते. त्यानंतर तिला तंजावूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार कामी न आल्याने आणि मुलीची प्रकृती खालावत गेल्याने 19 जानेवारीला या मुलीचा मृत्यू झाला होता.

सदर मुलगी ही शाळेच्या होस्टलमध्ये राहात होती. बुदालूर तालुक्यातील हे हॉस्टेल ख्रिश्चन मिशनरी संस्थेतर्फे चालवले जात होते. या मुलीने आरोप केला होता की तिला हॉस्टेलमध्ये त्रास दिला जात होता. वॉर्डन आपल्याला सतत ओरडतो, सगळ्या खोल्या साफ करायला लावतो आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकतो असं या मुलीचं म्हणणं होतं. हा त्रास सहन न झाल्याने ९ जानेवारीला या मुलीने हॉस्टेलमध्येच विषारी द्रव्य प्यायले होते. हॉस्टेलच्या आचाऱ्याने तिला जवळच्या एका नर्सकडे नेलं होतं, जिथे तिला इंजेक्शन आणि काही औषधं देण्यात आली होती. यानंतर मुलीला तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं होतं. त्यांनी मुलीला 15 तारखेला रुग्णालयात दाखल केलं होतं.

15 जानेवारीला रात्री 8.30 च्या सुमारास मुलीच्या घरच्यांनी पोलिसांना तिने विष प्यायल्याचे कळवले होते. पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठत मुलीचा व्हिडीओवर जबाब नोंदवून घेतला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही मुलीचा मृत्यूजबाब नोंदवण्यात आला होता असं पोलीस अधीक्षक रावली प्रिया यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला तेव्हा मुलीच्या आईवडिलांच्या चौकशीत मुलीवर धर्मांतरणासाठी काही दबाव असल्याचे कळाले नव्हते.

या मुलीचा हॉस्टेलमध्ये त्रास दिला जात असल्याची तक्रार करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओतील माहिती खरी आहे अथवा नाही याचा पोलिसांनी तपास केला असता त्यात त्यांना तथ्य आढळले आहे. यामुळे पोलिसांनी वॉर्डनला अटक केली आहे. हा व्हिडीओ मुलीने रुग्णालयात असतानाच रेकॉर्ड केला होता. व्हायरल व्हिडीओ बाबत बोलताना पोलीस अधीक्षक रावली प्रिया म्हणाल्या की व्हिडीओ व्हायरल करून मुलीची ओळख अशा पद्धतीने सार्वजनिक करणं हे चुकीचं आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.