
>> राजेश चुरी
कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड अशा विविध वायूंमुळे तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढल्यावर पावसाच्या ‘पॅटर्न’वर परिणाम होतो. परिणामी उन्हाळ्यात पाऊस तर कधी थंडीच्या मोसमात पावसाची हजेरी लागते. गारपीटही वाढते आहे. त्याची प्रचीती आता येत आहे. हवामान बदलाकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे प्रमाण वाढत जाणार आहे, असा स्पष्ट इशारा हवामान व कृषितज्ञांनी दिला आहे.
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांसह फळबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या मुद्दय़ावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काढणीला आलेली पिके आडवी झाल्याने बळीराजा कोलमडून पडला आहे. शेतकरी राजा सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या (गुरुवार) साजरा होणाऱया जागतिक हवामान दिनानिमित्त हवामान व कृषितज्ञांनी हवामान बदलाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
सध्याच्या हवामान बदलाचा शेतीला पूर्णपणे फटका बसला आहे. चांगल्या उत्पन्नासाठी चांगल्या प्रतीचे वाण विकसित केले जातात, पण हवामान बदलात ते टिकाव धरत नाही. किडीचा उद्रेक होतो. अवेळी पाऊस झाला तर शेतीतील पाण्याचा निचरा होत नाही. याचा मोठा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसतो. आताच्या अवकाळी पावसाने रब्बीची पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी वेळोवेळी हवामान खात्याच्या इशाऱयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे कृषितज्ञ सांगतात.
आज जागतिक हवामान दिन गारपिटीचा धोका वाढतोय
गेल्या काही वर्षांपासून गारपिटीचेही प्रमाण वाढले आहे. नाशिक, धुळे, नांदेड, लातूरमध्ये गारपिटीचे सध्या प्रमाण वाढले आहे. थंड हवामान तयार होते, मग तापमान वाढते. त्यात पावसाची प्रक्रिया सुरू झाल्यावर गारा पडतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होते. भविष्यात हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे.
भात लागवडीचा परिणाम
कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात भाताची लागवड होते. जेव्हा भाताच्या रोपांची लावणी होते तेव्हा त्या जागेतून मोठय़ा प्रमाणावर मिथेन गॅस तयार होतो. त्यातून आपल्याला नेहमी ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ दिसतो. त्यामुळे रोपांची लागवड न करता थेट बिया लावल्या तर मिथेन गॅस तयार होणार नाही. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हा प्रयोग करावा लागेल, असे बारामती कृषी महाविद्यालयातील कृषितज्ञ व कृषी विद्या विभागाचे प्राध्यापक प्रवीण सरवळे सांगतात.
हिंदुस्थानात सरासरी 1194 मिमी तर राज्यात सरासरी 1200 मिमी पाऊस पडतो. आपल्याकडे शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, पण आता हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्नच बदललेला आहे. हा पाऊस समान पडत नाही. कधी पंधरा दिवस पडतो, मध्येच गायब होतो. हे सर्व हवामान बदलाचे संकेत आहेत.
भूतानमध्ये कार्बन उत्सर्जन सर्वात कमी
2050 पर्यंत जगातील तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा जागतिक पातळीवरील हवामानतज्ञांनी दिला आहे. परिणामी भविष्यात किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जगात भूतानमध्ये कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवल्यास तापमान वाढ अटळ असल्याचा इशारा प्रा. प्रवीण सरवळे यांनी दिला आहे.