बाजार समितीत अन्नधान्यांची खरेदी बंद

57

सामना ऑनलाईन, धुळे

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणातील होत असलेली आवक आणि वळीवाच्या पावसाने केलेले नुकसान, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्यांची खरेदी बंद करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका लक्षात घेऊन बाजार समितीत २० मेपर्यंत भुसार मालातील अन्नधान्य तसेच मक्याची खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र, कांदा, भाजीपाला आणि गुरांचा बाजार सुरू असून शेतकऱ्यांनी कांदा आणि भाजीपाला विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

धुळे शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह वळीवाचा पाऊस झाला. अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सुमारे अर्धा तास हा पाऊस झाला. पावसाच्या सरी जरी सामान्य असल्या तरी त्यावेळी सोसाट्याचे वारे मोठ्या प्रमाणात वाहिले. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या भुसार मालाचे नुकसान झाले. त्यात ज्वारी, बाजारी आणि अन्य कृषी मालाचा समावेश होता.

विशेषतः अलीकडे व्यापाऱ्यांनी मक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. खरेदी केलेला मका व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात असलेल्या शेडमध्ये ठेवला होता. या ठिकाणी ठेवण्यात आलेला मका सुरक्षित जरी असला तरी पाऊस होताना मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वादळीवारे वाहिल्यामुळे पावसाचे पाणी थेट मक्यासह अन्य भुसार मालापर्यंत पोहोचले. पावसाच्या पाण्यामुळे अन्नधान्याच्या गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे फेरविक्रीत व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० मेपर्यंत भुसार मालातील अन्नधान्य खरेदी करायचे नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

२० मेपर्यंत भाजीपाला विक्रीसाठी आणा
नुकसान हे कारण असले तरी चलनटंचाई हेही एक कारण असल्याची चर्चा बाजार समितीत होती. व्यापारी भुसार माल खरेदी करणार नसल्याने शेतकऱ्यांनी भुसार मालातील अन्नधान्य विक्रीसाठी २० मेपर्यंत आणू नये. मात्र, कांदा आणि भाजीपाला मात्र विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या