विठ्ठलाच्या दारी घोटाळेबाजांचा चमत्कार

मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा

सामना ऑनलाईन,पंढरपूर

घोटाळेबाज कुठे घोटाळा करतील याचा नेम नाही. देवालाही या घोटाळेबाजांनी सोडलेलं नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. यामध्ये गरीब आणि सामान्य भाविकांची संख्या सर्वाधिक असते. हे सगळे भावित त्यांच्या ऐपतीनुसार देवाच्या चरणी दान देत असतात. त्यामुळे विठ्ठल मंदिरातील दान पेटीमध्ये १०,२०,५० रूपयांच्या नोटा जास्त असतात. नोटाबंदीनंतर दानपेटीतील या छोट्या रकमेच्या नोटा गायब झाल्या होत्या. त्या जागी मोठ्या रकमेच्या नोटा म्हणजेच  पाचशे आणि हजाराच्या नोटा मोठ्या प्रमाणात दानपेटीमध्ये आढळून आल्या होत्या. हा सगळा प्रकार एक घोटाळाच असल्याचा आरोप केला जाऊ लागला होता. या सगळ्या प्रकारावर दैनिक सामनाने वेळोवेळी प्रकाश टाकला होता. आता या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

नोटाबंदीनंतरच्या पहिल्या आठवड्यात १ कोटी १५ लाख रुपये देणगी रुपात जमा झाले होते. यातील बहुतांश नोटा या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या होत्या. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरात आले होते. त्यावेळी त्यांना या प्रकाराबाबत विचारण्यात आलं. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. विठूरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा शब्द दिल्याने गोरगरीब वारकऱ्यांच्या पैशावर डल्ला कोणी मारला हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या