युती व्हायला हवी, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट प्रतिपादन

49

सामना ऑनलाईन, ठाणे

वर्षानुवर्षे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्या पक्षांनी देशाला लुटलं आहे. अशा लुटारूंच्या हातून आपला महाराष्ट्र आणि देश बाहेर काढायचा असेल तर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक टिपटॉप प्लाझा येथे झाली. यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी  कार्यकर्त्यांच्या मनात युतीचं नेमकं काय, असा प्रश्न असेल; पण त्याची काळजी तुम्ही करू नका. युतीच्या संदर्भात योग्य चर्चा योग्य पातळीवर सुरू आहेत. कारण आपली युती केवळ सत्तेसाठी नाही तर एका ध्येयधोरणाने झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन यावे, त्यांना पारदर्शी कारभार मिळावा यासाठी आम्ही युतीच्या चर्चा सुरू केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमचे अनेक बाबतीत शिवसेनेशी मतभेद आहेत हे प्रामाणिकपणे सांगतो. आमच्याही सगळ्या गोष्टी शिवसेनेला मान्य असाव्यात अशी आमची अपेक्षा नाही, कारण आम्ही दोन वेगळे पक्ष आहोत आणि दोन वेगळ्या पक्षांची मते वेगळी असू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशात आणि राज्यात अनेक वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची संकल्पना उदयाला आली आहे. देशाला आणि महाराष्ट्राला लुटणाऱया काँग्रेसला पुन्हा ताकद मिळणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. यासाठीच युतीची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजप युती ही केवळ जागावाटपासाठी नाही. जागांची तडजोड तर कुणाशीही करता येते. जनतेच्या जीवनात नव्या परिवर्तनाचा आमचा संकल्प आहे.

नगरपालिकांच्या यशाने हुरळून जाऊ नका…

नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. जनतेने विश्वास दाखविला, पण या यशाने हुरळून जाऊ नका. मिळालेल्या सत्तेचा उपयोग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करा, अशा शब्दांत आज फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आगामी  महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत फक्त नेत्यांच्या अवतीभवती फिरणाऱया बगलबच्चांना कोणत्याही परिस्थितीत तिकिटे देणार नाही, असेही त्यांनी बजावले.

इलेक्ट्रॉनिक निधी उभा करा!

 संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक्स पैशांच्या दिशेने वाटचाल करीत असतानाच राजकारणातही पारदर्शीपणा आणावी लागेल. आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक निधी जमा करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. चेक तसेच मोबाईलच्या माध्यमातून देणगी घेऊन इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट गेट वे तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

thane-bjp-banner

ठाण्यात ‘शतप्रतिशत भाजप’चे फलक

भाजप कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या नेत्यांच्या स्वागताच्या होर्डिंगशेजारी ‘युती नको.. एकटे लढा’, ‘स्वबळ असताना युतीच्या कुबडय़ा कशाला?’ असे फलकही लागले होते. या फलकांवर कोणाचेही नाव नसले तरी ‘एक ठाणेकर’  या नावाने लागलेल्या या फलकांची चर्चा मीडियात सुरू होती.

नागपुरात शिवसैनिकांचा ‘एकला चलो रे’चा नारा

नागपूर ः नागपुरात शिवसैनिकांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आमदार आणि जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात आमची स्पर्धा आता काँग्रेस-राष्ट्रवादीशी नसून भाजपशी आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर सर्व 151 जागा लढवण्यासाठी तयार आहे, असे ठामपणे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या