मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून, नंदुरबार येथून प्रारंभ

945

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या नंदुरबार ते सोलापूर या दुसऱ्या टप्प्याला 21 ऑगस्टपासून नंदुरबार इथून प्रारंभ होत आहे. 11 दिवसांच्या या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा प्रवास 14 जिल्ह्यातील 55 विधानसभा असा एकूण 1839 किलोमीटरचा असणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ 1 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित झाला होता. हा टप्पा 9 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे संपणार होता. मात्र, राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे तीन दिवस आधीच महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे, 51 विधानसभा आणि 1369 किलोमीटर इतका प्रवास झाला होता. या टप्प्यात यात्रेला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

आधीच्या नियोजनानुसार, महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होणार होता. मात्र आता यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून 21 ते 31 ऑगस्ट या दरम्यान नंदुरबार ते सोलापूर असा प्रवास होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या