जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, मुंडे बहिणींचा पत्ता कट होणार?

सामना विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्लीतील तेली समाज अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली होती. ही भेट अराजकीय असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीतच क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. भाजप प्रवेशानंतर क्षीरसागर यांना लोकसभेचे तिकीट देखील देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली असून त्यामुळे मुंडे बहिणींचा पत्ता कट होणार असे बोलले जात आहे.

नुकतंच नवी दिल्लीत पार पडलेल्या तेली समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. क्षीरसागर यांच्या अधिवेशनासाठी मदत करा अशा सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे फडणवीस जातीने या अधिवेशनाला उपस्थित राहिले अशी माहितीही सूत्रांनी दिली. या अधिवेशनाच्या आधीपासूनच क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र अधिवेशनानंतर क्षीरसागर यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने या नेत्यांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा राजधानीपासून महाराष्ट्रापर्यंत रंगली होती. तसेच बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची खासदार म्हणून कामगिरी खूपच सुमार असल्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील मुंडे गटाचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने बीड या त्यांच्या बालेकिल्ल्यात क्षीरसागरांनी उमेदवारी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा भाजप नेतृत्वाचा इरादा असल्याचे मानले जात आहे.

बीड जिह्याच्या राजकारणात क्षीरसागर यांची राष्ट्रवादीतील प्रस्थापित मराठा नेत्यांकडून कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागर यांच्या अधिवेशनाला दिलेल्या बळामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपकडे मोठा ओबीसी चेहरा नाही. त्यातच मुंडे यांची कन्या व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना काटशह देण्याच्या उद्देशाने क्षीरसागर यांना बळ दिले जात असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश होईल, असे सांगण्यात येते.

एक प्रतिक्रिया

  1. पत्रकाराने आपले ज्ञान एकदा तपासून पहावे, बीड मध्ये मुंडे भगिनींना डावलून काही करता येईल याची शक्यता मांडणारा सुध्दा वेडाच म्हणावा लागेल…!!

    फक्त मुंडे या नावाला विरोध जरी केला तरी आपला गेम वाजतो याची अनुभूती जयदत्त अण्णांनी 2004 साली घेतली आहे..!!

    बीडच्या विधानसभेचे तिकीट म्हणत असाल तर ते नक्कीच क्षीरसागर यांना दिले जाईल कारण मेटे सध्या हवेत आहेत..!!