उठा उठा रिंग आली, मुख्यमंत्र्यांचा फोन घेण्याची वेळ झाली! टिका झाल्यावर शिंदेंचा फोन घेण्यासाठी शेतकऱ्यांना झोपेतून उठवलं

shinde-phone

नियोजित कार्यक्रमानुसार अतिवृष्टीग्रस्त भागांच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ दिला असतानाही आठ तास ताटकळत बसावे लागल्याने नांदुसा येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका झाल्यानंतर काल रात्री मुंबईकडे परतताना साडेबारा वाजता विमानतळावरून नांदुसा येथील शेतकऱ्यांना रात्री झोपेतून उठवून त्यांच्याशी व्हिडीओद्वारे संपर्क केला. आणि त्यांच्याशी बातचित केली. त्यानंतर ‘देर आये दुरुस्त आये’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असतानाही आपला नांदेडचा दौरा चारवेळा बदलून अखेर पाचव्या सुधारीत दौऱ्यानुसार सायंकाळी साडेचार वाजता नांदेडला पोहोचले. विकास कामांच्या भूमिपूजनाचा उल्लेख नसताना सुद्धा त्यांनी ऐनवेळी 192 कोटींच्या विकासाच्या कामांचे भूमिपूजन केले. मात्र या कार्यक्रमाला ना जिल्हाधिकारी उपस्थित राहिले, ना मनपाचे आयुक्त. ज्याठिकाणी हे कार्यक्रम होणार होते त्यातील व्यवस्था जशीच्या तशी ठेवण्यात आली, कोनशिलाही त्याच जागी राहिल्या, भक्ती लॉन्सच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी नारळ फोडून या विकास कामांचे भूमिपूजन झाल्याची घोषणा केली व कामांच्या नावाची यादी वाचून दाखविली. कार्यकर्त्यांचा मेळावा असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांचीच उपस्थिती होती.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री भक्ती लॉन्सजवळून दहा किलोमीटरवर असलेल्या नांदुसा येथे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार होते. मात्र हिंगोली, औंढा या भागातील कार्यक्रम आणि रात्री लगेच मुंबईला परतायचे होते, म्हणून त्यांनी नांदुसा येथील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न भेटता थेट हिंगोली जिल्हा गाठला. तब्बल सात तास वाट बघून नांदुसा येथील शेतकऱ्यांनी आपले घर गाठले व तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून टिका झाल्यानंतर रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला मध्यरात्री नांदुसा येथे जाऊन शेतकऱ्यांना गोळा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व तहसीलदार किरण अंबेकर यांनी नांदुसा गाव गाठले आणि घरोघर जावून शेतकऱ्यांना उठविले. एका शेतकऱ्याच्या घरी आठ ते दहा जण शेतकरी जमा झाले. त्यानंतर व्हिडीओव्दारे त्यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी होऊन एक महिना झाला तरी शासनाची मदत आम्हाला मिळाली नाही, पूर्ण खरिपाचा हंगाम भुईसपाट झाला, शेतात पाणी आहे, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काळजी करु नका, येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. मी आपल्या भागात कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकलो नाही, त्यामुळे त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. व्हिडीओव्दारे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे देर आये दुरुस्त आये, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दोन पाकीटमार पकडले

दरम्यान, भक्ती लॉन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी होणार असल्याने त्याठिकाणी काही पाकीटमार आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. साध्या वेशातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी दोन मोबाईल चोरट्यांना पकडून 29 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. या दोघांनाही भाग्यनगर पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोबाईल चोरट्यांना शिताफीने पकडले.