तरंगत्या महागणपतीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

48

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने खिर्डी येथील शेततळ्यात तरंगता महागणपती साकारल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. ट्विटरवरून त्यांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी आज सोमवारी मुख्यमंत्र्यांना या महागणपतीची प्रतिमा भेट दिली.

रत्नपूर तालुक्यातील खिर्डी येथे शेततळ्यात ८० फूट तरंगता महागणपती साकारण्यात आला आहे. पंचक्रोशीत याबाबत कुतूहल निर्माण झाल्याने शेकडो गणेशभक्तांनी येथे भेट देऊन महागणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, मुक्तिसंग्रामदिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी त्यांना या महागणपतीची प्रतिमा भेट दिली. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून या उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिष्ठानच्या वतीने पाण्यावर तरंगणारा महागणपती साकारला. हा अतिशय सुंदर प्रयत्न असून, त्यांनी यासाठी परिश्रम घेणार्‍यांचेही कौतुक केले आहे.

भाविकांची गर्दी

दरम्यान, खिर्डी येथील शेततळ्यात असलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मुंबई, पुणे, नांदेड, सातारा, अमरावती, परभणी यासह अनेक शहरातून भाविक खिर्डीत आले असून, आतापर्यंत हजारो भाविकांनी या महागणपतीचे दर्शन घेतले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या