मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. शनिवारी असलेल्या घटस्थापना आणि नवरात्रोत्सवासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्याबाबतचे निर्देश पाळत साधेपणाने उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

”घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वच सण, उत्सव काळजी घेत साजरे करत आहोत. ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ याचे भान ठेवत नवरात्रोत्सव साजरा करू या, संकटांवर मात करू या, हीच मनोकामना,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे, असे नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही, असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया, असेही त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा कारवा, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या