भाजपविरोधी राजकीय घडामोडींना महाराष्ट्रातून दिशा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव यांची प्रदीर्घ चर्चा

  • सूडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नाही!
  • देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात घालता केवळ इतरांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.हे असले राजकारण, कारभार मोडून काढायला हवे.
  • देशातील वातावरण गढूळ झाले आहे, अशाच पद्धतीने कारभार सुरू राहिला तर आपल्या देशाला भवितव्य काय?

‘देशातील राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत आहे. राज्यकारभार दूर राहिला पण सूडाचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर सुरू झाले आहे. हे सूडाचे राजकारण ही आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचे हिंदुत्व नाहीच नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भेटीनंतर ठणकावून सांगितले. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱयाला बदनाम करण्याचा जो प्रकार देशात सुरू झाला आहे तो मोडून काढण्यासाठी एक चांगली दिशा आम्ही दोघांनी ठरवली आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितले.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बिगर भाजपशासित राज्यांची मोट बांधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

उभय नेत्यांनी या भेटीमध्ये देशातील विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. या भेटीनंतर दोघांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भेटीविषयीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. ‘गेल्या काही दिवसांपासून भेटणार भेटणार अशा बातम्या येत होत्या तो दिवस आज प्रत्यक्ष उजाडला. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. त्यानंतर दुसऱया दिवशीच आमची भेट झाली. या भेटीत लपवण्यासारखे काहीही नाही. आतमध्ये काही बोलायचे आणि बाहेर आल्यावर नाही, सदिच्छा भेट होती असे सांगायचे. असे आमचे काहीही नाही.’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नव्या विचारांची सुरूवात

‘देशातील राज्ये एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणाची हजारो किमीची सीमारेषा एक आहे. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यांत एक चांगले वातावरण राहायला हवे. नाहीतर प्रत्येक जण आपापला इरादा घेऊन पुढे चालला आहे. राज्य गेले खड्डय़ात…देश गेला खड्डय़ात…हे राजकारण देशाला परवडणार नाही. नव्या विचारांची सुरुवात झाली आहे, त्याला आकार यायला थोडा अवधी लागेल. प्रयत्नांची सुरुवात केल्यानंतर मेहनत करावी लागेल.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बाभळी बंधारा, तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. उभय राज्यांत सुरू असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवणाऱया उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुष्पगुच्छ, शाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीही स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही सत्कार केला. या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई,  शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह आदी उपस्थित होते.  मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री कोण होईल, पंतप्रधान कोण बनेलयापेक्षा देशाचे काय होईल  हा विचार करायला हवा!

मुख्यमंत्री कोण होईल, पंतप्रधान कोण बनेल याचाच विचार सध्या केला जातोय. पण आम्ही देशाचा विचार करायला सुरूवात केली आहे असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत तसेच के. चंद्रशेखर राव यांनी देशातील वातावरण गढूळ झाले आहे असे मला सांगितले. हे असेच चालू राहिले तर देशाला शेवटी भवितव्य काय?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

बिघडलेल्या राजकीय स्थितीवर मार्ग काढण्यावर चर्चा – शरद पवार

देशातील बेरोजगारी, गरिबी, भूकबळी अशा समस्यांना तोंड देण्यासाठी काय करता येईल यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. देशात ही जी स्थिती बिघडली आहे, त्या स्थितीवर मार्ग काढण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले, आम्ही राजकीय लोक भेटतो तेव्हा राजकीय मुद्दय़ांवर अधिक चर्चा होत असते. मात्र आजची बैठक वेगळी होती. आज राजकीय चर्चा अधिक झाली नाही. विकासाच्या मुद्दय़ांवर अधिक चर्चा झाली. तेलंगणामध्ये शेतकऱयांच्या भल्यासाठी जे पाऊल उचलले गेले ते देशासाठी दिशादर्शक  होते. देशात एक विकासाचा माहोल तयार करण्याची गरज आहे.

 शरद पवार आपल्या देशाचे खूप अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नावाने रेकॉर्डदेखील आहे. ते देशाचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ते सेवा करत आहेत. त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. एकत्र काम करायची गरज आहे, या विषयावर आमचं एकमत झालं आहे. लवकरात लवकर आम्ही देशातील अनेक पक्ष आणि नेतेमंडळींसोबत बातचित करू. आम्ही बारामतीत पुन्हा भेटण्याचा विचार आहे. जे आमच्यासोबत येण्यास तयार आहेत त्या सर्वांना जोडून आम्ही काम करु. रस्ता काढायला थोडा वेळ लागतो. पण एकदा अजेंडा बनल्यानंतर आम्ही तो अजेंडा जनतेसमोर ठेवू, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले.

पवार यांना विसरू शकत नाही – केसीआर

मी शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी तेलंगणा राज्य बनवण्याच्यावेळी म्हणजे 1969 साली वेगळ्या राज्याचा निश्चय झालेला तेव्हापासून ते तेलंगणा राज्य प्रत्यक्षात होईपर्यंत पाठिंबा दिला. आम्ही त्यांना संपूर्ण आयुष्य विसरू शकत नाही. मी पूर्ण जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. अशी प्रतिक्रिया के. चंद्रशेखर राव यांनी दिली.

समविचारी नेत्यांची  तेलंगणात बैठक

पुढील काळात एकत्र काम करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. देशात असे अनेक लोक आहेत जे आमच्यासारखा विचार करतात. त्या लोकांसोबतदेखील माझी चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा सुरू होती. काही दिवसांतच हैदराबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्रित भेटू आणि चर्चा करून एक मार्ग ठरवू, असेही चंद्रशेखर राव यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांना हैदराबाद भेटीचे आमंत्रण

मी तेलंगणाची जनता आणि माझ्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी भावना यावेळी केसीआर यांनी व्यक्त केली.

परिवर्तनाचा मोर्चा महाराष्ट्रातून निघणार! महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊभाऊ

देशपातळीवर काहीतरी बदल व्हायला हवा, या अनुषंगानेच ही भेट होती. देशाच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. म्हणूनच देशाच्या परिवर्तनासाठी युवा पिढीच्या माध्यमातून त्या घडाव्यात हा हेतू आहे. देशातील वातावरण खराब व्हायला नको. तसेच एक मजबूत हिंदुस्थान निर्माण व्हायला हवा. यासाठी परिवर्तन आवश्यक असून महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो यशस्वी होतो, असा विश्वास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ असून दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यांत चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातून जी गोष्ट सुरू होते, ती पुढे खूप मोठी होते. आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत. याची सुरुवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून झाली असल्याचे के. चंद्रशेखर म्हणाले. देशाच्या विकासासाठी, चांगल्या सुधारणांसाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी, धोरणबदलावरही चर्चा झाली. या सर्व विषयांवर आमचे एकमत आहे, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांमुळे प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्य़ांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. या महापुरुषांकडून मिळालेल्या प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचे आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचे आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल, अशी अपेक्षा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी व्यक्त केली.