स्थानीय लोकाधिकार समितीच्या संघर्षामुळे कंपन्यांमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढला, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मराठी माणसाला त्याचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने जो संघर्ष केला त्यातून कंपन्यांमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले.

भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि स्थानीय लोकाधिकार समितीच्या संयुक्त प्रयत्नातून अलिबाग येथील वरसोली गावात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे ‘दैवत’ नावाचे विश्रामगृह बांधण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सीएमडी अतुल सहाय, खासदार अनिल देसाई, स्थानिय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कौशल्य प्रशिक्षण संस्थेची उभारणी

स्थानीय लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत अशी कौशल्यविकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

50 हजार कोटींची गुंतवणूक

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज आपल्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी अनलॉक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

अतुल सहाय यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगताना सरकार यासाठी करीत असलेल्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासदार अनिल देसाई यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या