ठाकरे सरकार स्थिर, ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया

7563

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोमवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत सुरू असलेल्या नाराजीच्या ‘बातम्या’ अफवाच ठरल्या आहेत.

‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोना व्हायरसच्या महामारीतून राज्याला बाहेर कसे काढायचे यासाठी सगळी ताकद पणाला लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे.’

…म्हणून राज्यपालांची भेट
राज्यपालांच्या भेटीसंदर्भात पवार म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो. यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असे राज्यपाल काल म्हणाल्याचे पवार यांनी सांगितले.

‘मातोश्री’वर काय चर्चा झाली?
बाळासाहेब गेल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. त्यामुळे मीच उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर येतो असे सांगितले. आमच्यात नेहमीच चर्चा होत असते. यावेळी कोरोना बाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या