कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

744
uddhav-thackeray

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्त शेतकऱयांची पहिली यादी आज जाहीर केली जाईल; एप्रिल अखेरपर्यंत ही कर्जमुक्ती पूर्ण होणार असल्याचे सांगतानाच गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी 1 मार्च रोजी काढण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करून शेतकरी व कामगारवर्गाला एकाच वेळी दिलासा दिला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱया आरोपांचा जोरदार समाचार घेतला आणि शेतकऱयांना जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असल्याचा दाखलाच दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखांचे कर्ज असणाऱया शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करीत आहोत. मात्र ही अंतिम यादी नक्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीएए व एनपीआरबाबत विचारपूर्वक निर्णय!
सीएए किंका एनपीआरबाबत सरकारमधील पक्षांची वेगवेगळी भूमिका नाही. सीएएबाबत काँग्रेसशी चर्चा झाल्यानंतरच याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. एनपीआरसंदर्भात जे प्रश्न अडचणीचे आहेत त्यासंदर्भात मंत्र्यांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल.

एल्गार परिषदेच्या केंद्राच्या निर्णयावर नाराजी
एल्गार परिषदेबाबतचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय केंद्राने आपल्या अधिकारात घेतला. हा निर्णय राज्याने घेतला नाही. राज्यावर अविश्वास दाखवून परस्पर निर्णय घेतल्याबद्दल आम्ही आमची नाराजी केंद्राला कळकणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केवळ भाजपने हिंदुत्वाचा मक्ता घेतलाय असे मानू नये
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या ठरावाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाचा मक्ता एकटय़ा भाजपने घेतलाय असे मानू नये. तेच म्हणतील ते हिंदुत्व असे समजू नये. सावरकरांचा विषय येईल त्यावेळी योग्य उत्तर देऊच. पण ज्यावेळी अंदमानातील त्या सावरकरांच्या ओळी काढण्यात आल्या, त्यावेळी भाजपचे रामभाऊ कापसे हे तिथे राज्यपाल होते, मात्र त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतो हे भाजपने सांगितलं नव्हतं. त्याचप्रमाणे एनपीआरच्या प्रश्नावलीत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याच्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी जगायचं कसं हा अधिकार देशातील जनतेचा आहे, अशा स्पष्ट शब्दांत टोला लगावला. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्यात दंगेधोपे झालेले नाहीत. पण तिकडे दिल्लीमध्ये केंद्र सरकार असतानाही 60 दिवस शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. जेएनयूमध्ये जे अधिकारी घुसले त्यांना मारहाण केली त्या गुन्हेगारांना अद्याप पकडले गेले नाही. तेव्हा कुणाच्या बुडाखाली बर्फ आहे किंवा किती जाळ ठेवलाय हे त्यांनी बघावं, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी हे सरकार मराठा समाजाची बाजू कोर्टात ताकदीने मांडत आहे, त्यात हे सरकार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जीएसटीचे पैसे मंदगतीने नव्हे तर बुलेट ट्रेनच्या गतीने यायला हवेत
जीएसटीच्या परताव्याबाबत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, जानेवारीच्या सुरुवातीलाच जीएसटीच्या परताव्याबाबत केंद्र सरकारला पत्र दिलं होतं. त्यानंतर हळूहळू पैसे येणं सुरू झालं आहे. ते मंदगतीने येत आहेत. पण तिथे गती मंद नको तर ते पैसे बुलेट ट्रेनच्या गतीने यायला हवेत.

विरोधकांचे वय 6 वर्षे असते तर त्यांनाही चष्मा दिला असता
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नसून केवळ स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे. हे विरोधकांनी डोळे उघडे ठेवून बघावं, त्यांचं वय 6 ते 18 वर्षे असतं तर त्यांनाही चष्मे दिले असते’, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.

‘दिशा’ कायद्याचा अहवाल 30 मार्चपर्यंत
महिलांवरील वाढते अत्याचार रोखणाऱया ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण आंध्र प्रदेशात गेलो होतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तेथील मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. तो कायदा आपल्याकडे कसा करता येईल, त्यामध्ये काही सुधारणा करता येईल का, याबाबत पाच अधिकाऱयांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती 30 मार्चपर्यंत आपला अहवाल देईल. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू आणि नंतर हा विषय अधिवेशनात चर्चेला आणला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

या सरकारचे चांगले काम विरोधकांच्या पचनी पडत नाही
विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. विरोधी पक्षात आहेत म्हणजे आरोप केलेच पाहिजेत असे नाही तर सरकारच्या चांगल्या कामांना चांगले म्हणा. पण आपण स्वतः काही करायचे नाही आणि हे सरकार चांगलं काम करीत नाही, असे आरोप करायचे ही विरोधी पक्षाची भूमिका अयोग्य आहे. या सरकारने घराघरातील जनतेला आधार देण्यासाठी निर्णय घेतले. हे सरकार आता स्थिरावलं आहे आणि चांगलं काम करतंय हे विरोधकांच्या पचनी पडत नाही, पण त्यांनी खोटेनाटे आरोप केले तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे. आणि जनतेच्या मनात एक नक्कीच विश्वास आहे की हे आपले सरकार आहे. आपलेपणाची भावना आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अमाप, अचाट जाहीर करून उताणी पडायचं हे आम्ही करीत नाही
या सरकारने नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अमाप, अचाट असे काहीतरी जाहीर करायचं आणि पेलत नाही म्हणून उताणी पडायचं हे आम्ही करीत नाही. शेतकऱयांना कर्जमाफीची घोषणा केली त्याचप्रमाणे शिवभोजनाची योजनाही सुरू केली. मात्र त्यावरही टीका केली जात आहे. सध्या मोजकीच केंद्र सुरू केली आहेत, मात्र त्यामध्ये वाढ करीत आहोत. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱयांची जी वर्षानुवर्षांची पाच दिवसांच्या आठवडय़ाची मागणी तीही या सरकारने पूर्ण केली. त्याचप्रमाणे 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना चष्मे देण्याप्रमाणेच अनेक जनहिताचे निर्णय राज्य सरकारने घेतले असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

35 लाख शेतकऱयांची यादी राज्य सरकारकडे
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफीसाठी जी माहिती गोळा केली त्यामध्ये 35 लाख कर्जखात्यांची माहिती हाती आली असून त्याकर काम सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल आणि यामध्ये पूर्णतः पारदर्शकता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफीची जी पद्धत अकलंबिली आहे ती कशी चालते ती पाहण्यासाठी प्रत्येक जिह्यात दोन गाकांची ही यादी असेल. दुसरी यादी 28 फेबुवारीला जाहीर होईल. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत एप्रिलच्या अखेरपर्यंत आम्ही ही योजना पूर्ण करणार, असा विश्वासही मुख्यंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांनी 35 लाख शेतकऱयांची यादी सरकारकडे आली आहे. यापैकी जे शेतकरी पात्र ठरतील त्यानुसार ही कर्जमाफी केली जाईल, असे स्पष्ट केले.

महाविकास आघाडी अभेद्य; आम्ही उद्धव ठाकरेंसोबत
आम्ही सर्वचजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि महाविकास आघाडी अभेद्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी ही तिन्ही वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी झाली आहे. वेगवेगळय़ा विषयांवर वेगवेगळी मते असू शकतात, पण आघाडी म्हणून आम्ही एक आहोत असे अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या