तुमच्या त्यागामुळेच आजचे प्रजासत्ताक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वातंत्र्यसैनिकांसमोर कृतज्ञता

तुमच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. देश प्रजासत्ताक झाला. लोकशाही आली. तुमचे योगदान अमूल्य आहे. त्याला मी प्रणाम करतो.’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन सोहळा दिमाखदार पध्दतीने साजरा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि अनेक स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित 103 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध सिंगीत यांची भेट घेतली. त्यांची आस्थापूर्वक विचारपूस केली. तुमच्या नि:स्वार्थ त्यागामुळेच आम्ही आजचा दिवस पाहू शकलो अशा शब्दांत त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल ऋण व्यक्त केले. सत्यबोध सिंगीत यांनीही आनंद व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना आशिर्वाद दिला.

मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपाल व अन्य मान्यवर परत जाण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा कार्यक्रमस्थळी आले. तेथील स्वातंत्र्यसैनिक कक्षामध्ये जाऊन त्यांनी वयोवृध्द स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे पोलीस, अग्नीशमन दल, गृहरक्षक दल आदींनी संचलन केले. महापालिकेच्या बॅन्ड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण राष्ट्रभक्तीपूर्ण केले.

आपली प्रतिक्रिया द्या